Vishwas Nangre Patil: शहरात पोलिसांवर होणारे वाढते हल्ले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, नागपूरचे पोलीस आयुक्त (Police Commissioner) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरातील वाहतूक पोलिसांसह (traffic police) सर्व पात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर असताना ‘सर्व्हिस गन’ म्हणजेच पिस्तूल बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश गुरुवारी (दि. 16) संपूर्ण पोलीस दलाला देण्यात आले आहेत.
Vishwas Nangre Patil: गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचा उद्देश
शहरातील विविध चौकांमध्ये होणारी नाकाबंदी, विशेष तपासणी मोहीम आणि ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई दरम्यान वाहतूक पोलिसांना अनेकदा स्थानिक गुन्हेगार, संशयित किंवा नियम मोडणाऱ्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनेकदा पोलिसांवर जीवघेणे हल्ले किंवा धक्काबुक्कीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी हे शस्त्र बाळगणे अनिवार्य केले आहे. पोलिसांना आता काठीसोबतच शस्त्र सोबत ठेवावे लागणार आहे.
Vishwas Nangre Patil: वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ‘गन’ बाळगण्याचे आदेश
केवळ रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनाच नव्हे, तर नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनाही त्यांची अधिकृत सर्व्हिस रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तूल नेहमी सोबत ठेवण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले आहेत. पोलिसांची सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे हा या आदेशामागील मुख्य हेतू आहे.
Vishwas Nangre Patil: दोन दिवसांपूर्वीच दिले होते ‘नीट अँड क्लीन’ राहण्याचे निर्देश
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना ड्युटीदरम्यान अत्यंत शिस्तबद्ध राहण्याचे आदेश दिले होते. स्वच्छ गणवेश, उत्तम वर्तन आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला होता. आता शिस्तीनंतर थेट सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याचा निर्णय झाल्याने नागपूर पोलिसांची सज्जता आणखी वाढणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले