Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जर ते आठवलेंना… – Marathi News | Maharashtra Political Drama: Jayant Patil Meets Fadnavis and Shinde Sanjat Raut Clarifies Stand


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. अर्थखात्यावरून महायुतीत अनेक चर्चा सुरू असून त्यावरून बरीच अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार का, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या होत्या. या बद्दल सुरू असलेली कुजबूज शमते ना शमते तोच काल पुन्हा जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नंदनवन या निवासस्थानी दोन्ही नेते शिंदे यांना भेटले, त्यामुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. आधी मुख्यमंत्री, मग उपमुख्यमंत्री. या दोघांची जयत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे मविआमध्येही सगळं आलबेल ना, असा प्रश्न अनेकांना पडला असून जयंत पाटील यांच्या याच भेटीच्या मुद्यावरून मविआतील नेते, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.

शिंदे- जयंत पाटील यांची भेट, राऊत म्हणाले उद्या जर.. 

त्यावरून राऊत यांनी दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे. ज्या लोकांचं तुम्ही आत्ता नाव घेतलंत, उद्या हेच लोकं जर रामदास आठवलेंना भेटले, तर ते आठवले यांच्या पक्षात जात आहेत, असं तुम्ही म्हणणार का? असा खोचक सवाल राऊतांनी विचारला. या महाराष्ट्रात आणि देशात इतके राजकीय पक्ष आहेत, कोणी ना कोणी, कोणाची तरी भेट घेतच असतं ना. त्याचा अर्थ पक्षात गेले, दुसरे या पक्षात आले, असा होत नाही. जयत पाटील असोत किंवा जितेंद्र आव्हाड असोत, ते सर्व पक्षाच्या नेत्यांची भेट घेत असतात, ते फ्री बर्ड्स आहेत, भेटू देत असं म्हणत राऊतांनी या मुद्यावरून कोणताही प्रश्नच नसल्याचा सूचक इशारा दिला.

आता भाजपसोबत मार्ग वेगळे झाले असेल तरी आम्ही एकेकाळी…

ठाकरे गटाचं नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन होणार असून त्याचं निमंत्रण मुख्यमंत्री फडणवीसांनाही देण्यात आलं. मात्र यावरून नितेश राणे व इतर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण हा राजकीय विनोद असल्याचे म्हणण्यात आले. मात्र त्यावर राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं.  असं अजिबात नाहीये, हा राजकीय विनोद कसा असेल? राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त एका पक्षाचे नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात ना. तुम्ही आत्ता ज्यांची नावं घेतली, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेलं आहे. आता मार्ग वेगळे झाले असले तरी 25 वर्ष सलग आम्ही भाजपसोबत, देवेंद्रजी यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी (भाजप नेते) अशाप्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे, अशा शब्दांत राऊतांनी सुनावलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *