Pandharpur: वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात तब्बल 12 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार, FDA कडून तपासणी पूर्ण


Pandharpur: आषाढी एकादशी यंदा 25 जुलै रोजी आहे. यानिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, या काळात पायी चालत वारी करण्याची परंपरा आहे, अशात या एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे, यात्रा काळात प्रसादासाठी मंदिर समितीकडून तब्बल 12 लाख बुंदी लाडू बनविण्यात आले आहेत, गरजेनुसार ही संख्या अजून वाढविण्यात येणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरू असताना, मंदिर प्रशासनाने लाडू बनविण्याचे साहित्य आणि बनविलेले लाडू या दोन्हीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करून घेतली आहे. 

गेल्या 15 दिवसांपासून लाडू प्रसाद बनविण्याचे काम सुरू…(Ashadhi Ekadashi 2026)

गेले पंधरा दिवसापासून हा लाडू प्रसाद बनविण्याचे काम सुरू असून तब्बल 12 लाख लाडू तयार झालेले आहेत. यासोबत आषाढी एकादशीला लागणारे राजगिरा लाडू ही मोठ्या संख्येने तयार करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे. आषाढी यात्रा संपल्यानंतर पंढरपुरातून परत जाणारे लाखो भावी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून हे बुंदीचे लाडू आपल्या घराकडे आणि कोणाकडे घेऊन जात असतात. यंदा गेल्या वर्षीपेक्षा यात्रेकरूंची संख्या वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन अजूनही गरजेनुसार 15 लाखापर्यंत लाडू बनविण्याची सर्व तयारी प्रशासनाने ठेवल्याचे राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.

आषाढी यात्रेत मुख्यमंत्री सहाय्यता केंद्राला वारकऱ्यांची मोठी पसंती, पालकमंत्र्यांची माहिती

सध्या सुरू असलेल्या आषाढी यात्रेत मुख्यमंत्री वारकरी सहाय्यता केंद्र यांची संख्या जवळपास दुपटीने वाढविल्याने वारकऱ्यांकडून याला मोठी पसंती मिळत असल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एबीपी माझाला सांगितले आहे. गेल्या वर्षी देखील मुख्यमंत्री वारकरी सहाय्यता केंद्र वारकऱ्यांच्या पसंतीस उतरले होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर सूचना देत चालू वर्षे याची संख्या जवळपास दुप्पट करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वारकऱ्यांसाठी विविध सुविधा..

सध्या संपूर्ण पालखी मार्गावर उभारण्यात आलेले हे विशाल जर्मन हँगर मंडप वारकऱ्यांचे विसाव्याचे ठिकाण बनत आहे. या केंद्रांमध्ये वारकऱ्यांना विसाव्या सोबत स्वच्छतागृहे आरोग्य सुविधा, पायाचे मसाज, शुद्ध पाणी याची सोय केली असून याच ठिकाणी रात्री या वारकऱ्यांना भजन कीर्तन करण्यासाठी देखील स्टेज आणि इतर सुविधा करण्यात आल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. 

महिलांसाठी वेगळे स्नानगृहे, चेंजिंग रूम आणि हिरकणी कक्ष

पालकमंत्र्यांच्या माहितीनुसार, या मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रात महिलांसाठी ही वेगळी व्यवस्था केली असून महिलांसाठी वेगळे स्नानगृहे, चेंजिंग रूम हिरकणी कक्ष उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा सर्व सुविधा दुपटीने वाढविण्यात आल्याने पंढरपूर कडे येणाऱ्या सर्व पालखी मार्गांवर मुख्यमंत्री सहाय्यता केंद्र हे वारकऱ्यांचे पसंतीस उतरत असून दिवसभर प्रवास करून थकलेले वारकरी येथे विश्रांती घेतात आणि दुसऱ्या दिवशी नव्या दमाने पुन्हा पुढची वाट चालतात असे गोरे यांनी सांगितले आहे. पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या होत्या त्याचे तंतोतंत पालन केले असे गोरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

Shani Vakri: पुढच्या 10 दिवसांत शनिची मोठी चाल, 5 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा, प्रगतीचे मार्ग खुले, पैसा, नोकरीत लाभ, तुमची रास?

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *