Shaina NC WhatsApp Hacked: ‘थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा’, शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला


Shaina NC WhatsApp Hacked: राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि सायबर गुन्हेगारीची (cyber crime) मोठी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि फॅशन डिझायनर शायना एन.सी. (Shaina NC) यांचे अधिकृत व्हॉट्सॲप खाते (WhatsApp account) हॅकर्सनी हॅक केले आहे. यानंतर हॅकरने त्यांच्या ओळखीच्या लोकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवून अवघ्या काही तासांत तब्बल 3.92 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेमुळे व्हीआयपी (VIP) लोकांची सायबर सुरक्षाही धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी हॅकरने शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक केले. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांना ‘मला थोडी मदत हवी आहे’ असे भासवणारे संदेश (messages) पाठवले. हॅकरने समोरच्या व्यक्तींना प्रत्येकी 49,000 रुपये पाठवण्याची विनंती केली आणि हे पैसे दोन तासांत परत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर 8 जणांनी प्रत्येकी 49,000 रुपये पाठवले. अशा प्रकारे अवघ्या काही वेळात हॅकरने तब्बल 3 लाख 92 हजार रुपयांवर डल्ला मारला.

Shaina NC WhatsApp Hacked: पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर शायना एन. सी. आक्रमक 

आपले व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे समजताच शायना एन.सी. यांच्या टीमने गुरुवारी दुपारी 1.58 वाजता पोलिसांकडे अधिकृत तक्रार (police complaint) नोंदवली. हॅकर्सनी ज्या गुगल पे (Google Pay) खात्यावर पैसे मागवले होते, ते खाते तातडीने ब्लॉक (block) करण्याची विनंतीही पोलिसांना करण्यात आली होती.

मात्र, पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप स्वतः शायना एन.सी. यांनी केला आहे. जर पोलिसांनी तक्रार मिळताच वेगाने पावले उचलली असती, तर इतर लोकांची आर्थिक फसवणूक टळली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. पोलिसांच्या या दिरंगाईबद्दल आणि ढिसाळ वृत्तीबद्दल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार नोंदवली आहे.

Shaina NC WhatsApp Hacked: सायबर पोलिसांकडून तपास सुरू 

या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना शायना एन.सी. यांनी सांगितले की, पोलीस फक्त ‘आम्ही शोध घेत आहोत आणि कारवाई सुरू आहे’ असे उत्तर देत आहेत, ज्यामुळे तपासाच्या प्रक्रियेतील विलंबाबाबत त्यांनी तीव्र असमाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *