Last Updated:
Doctor Murder Case : कर्नाटकातील धारवाड शहरात वैद्यकीय क्षेत्राला आणि संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली आहे.
धारवाड: कर्नाटकातील धारवाड शहरात वैद्यकीय क्षेत्राला आणि संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली आहे. एका नामांकित भूलतज्ज्ञ (Anesthetist) डॉक्टरची त्यांच्याच राहत्या घरात धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा ८ वर्षांचा निष्पाप मुलगाही गंभीर जखमी झाला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र, या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, घरात पतीचा मृतदेह आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना, मृत डॉक्टरची पत्नी मोबाईलवर सोशल मीडिया स्क्रोल करत बसली असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित पत्नीला ताब्यात घेतले आहे.
घराचा दरवाजा आतून बंद; संशयाची सुई घरातील व्यक्तीवरच
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. किरण होन्नण्णावर (वय ४३) असे हत्या झालेल्या भूलतज्ज्ञाचे नाव आहे. घटना घडली तेव्हा घरातील दरवाजे आणि खिडक्या सुरक्षित होत्या. बाहेरून कोणी अज्ञात व्यक्तीने घरात बळजबरीने घुसखोरी केल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे या हत्याकांडात घरातीलच व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. तपासादरम्यान संशयाची सुई थेट मृत डॉक्टरची पत्नी डॉ. प्रियांका यांच्याकडे वळली आहे.
रक्ताच्या थारोळ्यात मुलगा, आई मोबाईलमध्ये व्यस्त?
घटनेच्या दिवशी नातेवाईक सतत डॉ. किरण यांना फोन करत होते. मात्र, त्यांचे फोन पत्नी डॉ. प्रियांका उचलत होत्या. फोनवर बोलताना त्यांनी नातेवाईकांना दिशाभूल करणारी उत्तरे दिली. कधी “ते झोपले आहेत”, तर कधी “रुग्णालयात इमर्जन्सी केससाठी गेले आहेत”, अशी परस्परविरोधी माहिती त्यांनी दिली. संशय आल्याने नातेवाईक जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. डॉ. किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यांचा ८ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत वेदनेने विव्हळत होता. धक्कादायक म्हणजे, याच गंभीर परिस्थितीत डॉ. प्रियांका बाजूला बसून मोबाईलवर स्क्रोलिंग करत असल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
चौकशीत विसंगती अन् चाकूचा धाक; इन्सुलिनचे गूढ काय?
घटनेची माहिती मिळताच धारवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी जेव्हा डॉ. प्रियांका यांची चौकशी केली, तेव्हा त्यांच्या जबाबात प्रचंड विसंगती आढळून आली. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, काही दिवसांपूर्वीच प्रियांका यांनी पतीला चाकूचा धाक दाखवला होता. तसेच, पतीची हत्या केल्यानंतर आणि मुलावर हल्ला केल्यानंतर डॉ. प्रियांका यांनी स्वतःला इन्सुलिनचे ओव्हरडोस इंजेक्शन टोचून घेतल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीने वैद्यकीय तपासणी करत आहेत.
८ वर्षांच्या लेकराची मृत्यूशी झुंज सुरू…
या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ८ वर्षीय बालकाला तात्काळ अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडले की यामागे आणखी काही गुप्त कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या हाय-प्रोफाइल डॉक्टर हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात आणि वैद्यकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
Dharwad,Karnataka
Jul 17, 2026 11:16 AM IST
पती रक्ताच्या थारोळ्यात, मुलगा तडफडतोय अन् डॉक्टर पत्नी मोबाईल स्क्रोलिंगमध्ये; पोलीसही हादरले, मोबाईलचं वेड की…?
