Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची ‘चौबल सीट’ जीवघेणी स्वारी


पुणे: पावसाळा सुरू होताच पुणे आणि पर्यटन स्थळांवर उत्साहाच्या नावाखाली पर्यटकांच्या आणि तरुणांच्या बेजबाबदारपणाचे धक्कादायक (lonavala tourists dangerous stunts) प्रकार समोर येत आहेत. एकीकडे निसर्गरम्य लोणावळ्यात धुक्याची चादर आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असताना, तिथे रील्स आणि सेल्फीच्या नादात सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून थेट धोकादायक कड्यांवर स्टंटबाजी केली जात आहे. तर दुसरीकडे, पुणे शहरात चक्क शाळकरी आणि अल्पवयीन मुलांनी वाहतूक नियमांची ऐशीतैशी करत एकाच दुचाकीवर तब्बल चार जण बसून (minor boys four seat riding) जीवघेणा प्रवास केल्याचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, आता हुल्लडबाज पर्यटक आणि बेजबाबदार वाहनचालक व त्यांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

Pune News: लोणावळ्याच्या निसर्गात हुल्लडबाज पर्यटकांचा जीवाशी खेळ!

लोणावळा: लोणावळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावताच निसर्ग बहरून आला आहे. धुक्यात हरवलेला सह्याद्री, त्यातून फेसाळत कोसळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना खुणावत आहे. मात्र या मनमोहक निसर्गात काही हुल्लडबाज पर्यटक स्वतःच्याच जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र समोर आलं आहे. सहारा ब्रिज परिसरातील धबधब्यावर अनेक पर्यटक धोकादायक कड्यांवर चढून सेल्फी आणि रील्सच्या नादात सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. सततच्या पावसामुळे खडक आणि पायवाटा निसरड्या झाल्या असून, एका चुकीच्या पावलाची किंमत जीव गमावून मोजावी लागू शकते. तरीही अनेकजण कोणतीही काळजी न घेता धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. लोणावळा पोलिसांकडून वारंवार सुरक्षिततेचं आवाहन केलं जात असलं, तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. विकेंड सुरू होण्यापूर्वीच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून, अशा बेफिकीर पर्यटनामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच पर्यटकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. पोलिसांनी पर्यटकांना पहिला इशारा दिलाय, पुढं मात्र कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे.

Pune News: पुण्यात एकाच दुचाकीवर मिसुरडे न फुटलेल्या बालकांची “चौबल” सीट स्वारी

पुण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एकाच दुचाकी वरून ४ अल्पवयीन राईड मारत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. शिवसेनेच्या माथाडी कामगार सेने चे अध्यक्ष निलेश माझिरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. पुण्यातील वारजे भागातील हा व्हिडिओ असून एक शाळकरी मुलगा त्याच्या तीन मित्रांना घेऊन एक दुचाकी चालवत असल्याचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये त्यांना प्रश्न विचारले असता सगळे हसताना खिदळताना दिसतायत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पालकांनी आपली दुचाकी आपल्या पाल्यांना देताना एकदा विचार करावा असं मत आता व्यक्त केलं जात आहे. संबंधित तरुण हे अल्पवयीन असले तरी वाहतूक पोलीस, आरटीओ प्रशासन संबंधित वाहन मालकावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *