Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ ‘खाशाबा’वर, अभिनेता आहे तरी कोण?


Khashaba Movie Lead Role: मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार कथनशैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी भव्य कलाकृती घेऊन येत आहेत. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांनंतर आता मंजुळे ‘खाशाबा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून एका महाराष्ट्रातल्याच मातीतली कथा घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच अवघ्या 24 तासांत सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या टिझरमध्ये अनेक दिगजांची मांदियाळी आहे ,पण टिझर पाहिल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे ‘खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारणार?’ जब्या आणि परश्यानंतर खाशाबांच्या भूमिकेत नवा अभिनेता दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

खाशाबांच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, लाल मातीतील झुंज, संघर्षाची तीव्रता आणि सिनेमाचा मोठा आवाका प्रभावीपणे पाहायला मिळतो. कोल्हापूरच्या मातीत घडलेला आणि महाराष्ट्रासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

चित्रपटाची आणखी एक खास बाब म्हणजे खाशाबांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. कठोर ऑडिशन प्रक्रियेनंतर हा कलाकार निश्चित करण्यात आला असून त्याची घोषणा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘जब्या’ आणि ‘परश्या’नंतर आता खाशाबा जाधवची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्ड्री आणि सैराट चित्रपटांमधून परशाची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर आणि जव्याची भूमिका साकारणारा सोमनाथ अवघडे दोघेही महाराष्ट्रात घराघरात पोहोचले . प्रचंड लोकप्रियता त्यांना मिळाली ..त्यामुळे नागराज मंजुळे आता खाशाबाच्या निमित्ताने कोणाला लॉन्च करणार याकडे साऱ्यांच्याच लक्ष आहे.

चित्रपटाला संगीताची साथ दिग्गज जोडी अजय अतुल यांनी दिली आहे. तर कलाकारांच्या फळीमध्ये जितेंद्र जोशी,महेश मांजरेकर,गिरीश कुलकर्णी,संदीप कुलकर्णी,वैभव मांगले,छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी निर्मित आहे. ‘खाशाबा’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *