Mumbai Local : रात्री ९ ते सकाळी ८… मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता काय बदलणार? विधीमंडळात सरकारची मोठी घोषणा | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Mumbai Local Train : मुंबई लोकल प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.

रात्री ९ ते सकाळी ८... मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता काय बदलणार? विधीमंडळात सरकारची मोठी घोषणा
रात्री ९ ते सकाळी ८… मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता काय बदलणार? विधीमंडळात सरकारची मोठी घोषणा

मुंबई: मुंबई लोकल प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. आता लोकलच्या महिला डब्यात रात्री ९ ते सकाळी थेट ८ वाजेपर्यंत पोलीस-होम गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वी ही सुरक्षा केवळ सकाळी ६ वाजेपर्यंतच उपलब्ध असायची. मात्र, सकाळच्या सत्रात महिला डब्यांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधल्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली.

विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी मुंबई लोकल मधील वाढती गुन्हेगारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. २३ जून रोजी नालासोपारा येथील तरुणाच्या लोकलमधील हत्येचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या चर्चेदरम्यान आमदार चित्रा वाघ यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरत, सध्याची रात्री ९ ते सकाळी ६ ची पोलीस बंदोबस्ताची वेळ वाढवून ती सकाळी ८ वाजेपर्यंत करण्याची मागणी केली, जी सरकारने तात्काळ मान्य केली.

गर्दुल्ल्यांवर २५ दिवसांत कठोर कारवाई!

रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ल्यांच्या उपद्रवावर शिवसेनेचे अॅड. अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतली. “रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले वाढले आहेत आणि रेल्वेतील सिव्हिल ड्रेसमधील पोलीस कुठेच दिसत नाहीत,” असा थेट सवाल त्यांनी केला. यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम म्हणाले, “रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्हींची संख्या वाढवली जाईल. तसेच, या गर्दुल्ल्यांकडे ड्रग्ज येतात कुठून, याचा शोध घेण्यासाठी येत्या १५ दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांसोबत विशेष बैठक घेतली जाईल. पुढील २५ दिवसांत गर्दुल्ल्यांचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.”

अनेक गंभीर मुद्द्यांवर चर्चा

या चर्चेदरम्यान काँग्रेसचे भाई जगताप यांनी रेल्वे अपघातात दररोज होणाऱ्या सरासरी १० मृत्यूंचा चिंताजनक आकडा सभागृहासमोर मांडला. तर आमदार राजहंस सिंह यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक रेल्वे डब्यात बंदूकधारी सुरक्षा गार्ड नेमण्याची मागणी केली. लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

Mumbai Local : रात्री ९ ते सकाळी ८… मुंबई लोकलच्या महिला डब्यात आता काय बदलणार? विधीमंडळात सरकारची मोठी घोषणा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *