35 कोटींची ऑफर.. थलपती विजय यांचं सरकार उलथवण्याच्या कटात मोठा खुलासा – Marathi News | FIR against tamil nadu ex minister senthil balaji brother in 35 crore bribe to tvk mla thalapathy vijay


तमिळनाडूतील थलपती विजय यांच्या सरकारला अस्थिर करण्याच्या उद्देशाने कथित घोडेबाजार सुरू असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. उथगमंडलम विधानसभा मतदारसंघाचे टीव्हीकेचे आमदार एन. इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तमिळनाडू पोलिसांनी माजी डीएमके मंत्री आणि कोईंबतूर दक्षिणचे आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू अशोक कुमार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर सत्ताधारी टीव्हीके पक्षाच्या एका आमदाराला 35 कोटी रुपये देऊन पक्ष बदलण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संबंधित आमदाराला सत्ताधारी पक्ष सोडण्यास भाग पाडण्यासाठी वारंवार आमिषे आणि धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

इलैयाराजा यांनी सांगितलं की, थिरुनावुक्करसू नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्या व्यक्तीने इंडियन पॉलिटिकल डेमोक्रॅटिक स्ट्रॅटेजीज (IPDS) नावाची एक जनमत चाचणी संस्था चालवत असल्याचा दावा केला आणि एका प्रमुख राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या सांगण्यावरून तो त्यांच्याशी संपर्क साधत होता. थिरुनावुक्करसूने नंतर त्यांना तमिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्धच्या प्रस्तावादरम्यान एका विशिष्ट पद्धतीने मतदान करण्यास सांगितलं आणि त्या बदल्यात 35 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम देऊ केली. इलैयाराजा यांनी असाही आरोप केला की ही ऑफर नाकारल्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली.

इलैयाराजा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चेन्नईतील थिरुनावुक्करसू आणि या कटात सामील असलेल्या इतर दोघांनाही अटक केली आहे. तक्रारीच्या आधारे पुढे केलेल्या तपासात असं उघड झालं की, माजी डीएमके मंत्री आणि सध्याचे कोईंबतूर दक्षिणचे आमदार व्ही. सेंथिल बालाजी यांचे बंधू व्ही. अशोक कुमार यांनी आरोपी नरेशची चेन्नईमध्ये भेट घेतली होती. तसंच थिरुनावुक्करसू यानेही व्ही. सेंथिल बालाजी आणि व्ही. अशोक कुमार यांच्या सूचनेनुसार काम केल्याचंही वृत्त आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी नरेशने अशी कबुली दिली की, त्याने अशोक कुमार आणि सेंथिल बालाजी यांच्या सांगण्यावरून टीव्हीके आमदाराशी संपर्क साधला होता. तपासादरम्यान नोंदवलेल्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी अशोक कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह इतर चार कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय चेन्नई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाच जणांना अटक केली होती. त्यांच्यावरही टीव्हीकेच्या एका आमदाराला पक्ष बदलण्यासाठी प्रवृत्त करून सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्त्वाखालील टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने विजय यांनी सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *