Last Updated:
इंग्लंडमध्ये 21 जुलै पासून द हंड्रेड लीग 2026 सुरू होत आहे. यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव मार्च महिन्यात झाला तेव्हा सनरायजर्स हैदराबादने पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमद याला विकत घेतलं.
मुंबई : इंग्लंडमध्ये 21 जुलै पासून द हंड्रेड लीग 2026 सुरू होत आहे. यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव मार्च महिन्यात झाला तेव्हा सनरायजर्स हैदराबादने पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमद याला विकत घेतलं. 2008 आयपीएलनंतर कोणताही पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळला नव्हता, त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद द हंड्रेडमध्येही पाकिस्तानी खेळाडूला विकत घेणार नाही, असं बोललं जात होतं, पण तरीही काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादने अबरार अहमदला 2.45 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.
पाकिस्तानी खेळाडूला विकत का घेतलं?
अबरार अहमदला सनरायजर्स हैदराबादने विकत घेतल्यामुळे भारतामध्ये बराच वाद झाला होता. सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने अखेर या वादावर आणि अबरारला विकत का घेतलं? यावर मौन सोडलं आहे. द टेलिग्राफसोबत बोलताना काव्या मारनला पाकिस्तानी क्रिकेटपटूला टीममध्ये का घेतलं? असा प्रश्न विचारला गेला, पण तिने याबद्दल उत्तर देणं टाळलं. ‘आम्ही आमच्या मेन आणि वुमन अशा दोन्ही टीमबद्दल समाधानी आहोत. आम्ही खूप गोष्टींवर लक्ष दिलं’, असं काव्या मारन म्हणाली आहे.
अबरार अहमद प्लेइंग इलेव्हनमध्ये
द हंड्रेडच्या या मोसमात फक्त दोन पाकिस्तानी खेळाडू खेळणार आहेत. यातला अबरार अहमद सनरायजर्स लीड्सच्या टीममध्ये आहे तर उस्मान तारिक बर्मिंघम फिनिक्सकडून खेळेल. लीगच्या पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादने अबरारला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी दिली आहे. सनरायजर्स लीड्सने अबरारला 1 लाख 90 हजार पाऊंड्स तर उस्मान तारिकला बर्मिंघम फिनिक्सने 1 लाख 40 हजार पाऊंड्सना विकत घेतलं.
द हंड्रेडची सुरूवात 21 जुलैपासून झाली आहे तर फायनल 16 ऑगस्टला होणार आहे. द हंड्रेडमध्ये एकूण 8 टीम खेळणार आहेत, यातल्या 4 टीम आयपीएल मालकांच्या आहेत. मुंबई इंडियन्सकडे MI लंडन, सनरायजर्स लीड्स, LSG कडे मॅनचेस्टर सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे मालक GMR ग्रुपकडे साउथर्न ब्रेव टीमची मालकी आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 22, 2026 12:00 AM IST
