या चित्रपटाची कथा एका रहस्यमयी आयलँडची आहे, जिथे नायक त्याच्या आजोबांना वाचवण्यासाठी जातो. हा आयलँड अनेक रहस्यांनी भरलेला आहे आणि लवकरच तो पाण्यात बुडणार आहे. या चित्रपटातील अनेक सीन्स हैराण करणारे आहेत. याची कथा इतकी रंजक आहे की तुम्हाला जराही कंटाळवाणं वाटत नाही.
1 तास 33 मिनिटांचा हा एक हॉलिवूड चित्रपट आहे. जवळपास चौदा वर्षांपूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रग्गड कमाई केली होती. आता दीड दशकानंतर हा चित्रपट ओटीटीवर दमदार कामगिरी करत आहे.
ब्रॅड पेटन दिग्दर्शित 'जर्नी 2: द मिस्टीरियस आयलँड' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ'चा हा सीक्वेल आहे. यामध्ये ड्वेन जॉनसन, मायकल केन, जोश हचरसन, वॅनेसा हजेंस, लुइस गुजमॅन आणि क्रिस्टिन डेविस यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाची कथा किशोरवयीन शॉन अँडरसन (जोश हचरसन) आणि त्याचे सावत्र वडील हँक (ड्वेन जॉनसन) यांची आहे, जे एका कोडच्या डिस्ट्रेस सिग्नलचा पाठलाग करत दक्षिण प्रशांत महासागराच्या एका रहस्यमयी आणि अज्ञात बेटावर पोहोचतात.
2012 मधील सर्वांत यशस्वी चित्रपटांमध्ये याचा समावेश होता. आता चौदा वर्षांनंतर हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टॉप 10 ट्रेंडिंग यादीत समाविष्ट झाला आहे. भारतात पुन्हा एकदा या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतंय.




