Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


Uddhav Thackeray: एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, की ‘अब हिंदू मार नहीं खायेगा’. तसंच आज मी म्हणतोय, ‘अब हिंदू माफ नहीं करेगा’. जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत. येत्या रविवारी 5 तारखेला दादरला मारुती मंदिरात रामरक्षा आंदोलन करणार आहोत, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पक्ष वगैरे न बघता, जे जे रामभक्त असतील, जे जे हिंदू आहेत, त्यांनी या आंदोलनासाठी यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे राम रक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू, असे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या मागे ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांना तुरुंगवास झाला, त्या सगळ्यांचे कष्ट हे असे आम्ही वाया जाऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हे ऑपरेशन राम मंदिर भाजपवर उलटणार का?

उद्धव ठाकरे म्हणाले, हा संपूर्ण देशामध्ये जो काही  गोंधळ, सर्वसामान्यांबद्दल अनास्था उडवली आहे, कोणी कोणाला  कोणाचं उत्तरदायित्वच नाही, अशी स्थिती आहे. संपूर्ण देश भारतीय जनता पक्षाच्या अमलाखाली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचं मूळ जे आहे, ज्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो, ते म्हणजे राम मंदिर. कारसेवकांवर झालेले अत्याचार, गोध्रा हत्याकांड, अहमदाबादमधील दंगल, अगदी मुंबईमध्ये सुद्धा जे काही घडलं होतं, बॉम्बस्फोट असतील, आणखी काही गोष्टी असतील, त्यामध्ये हिंदूंनी बरंच काही सोसलं होतं. आणि त्या सगळ्याचा मी असं म्हणेन, भांडवल करून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्याचे ते म्हणाले. आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जातायत, आमदार-खासदार चोरले जातायत, खरेदी-विक्री चालू होते, याला ऑपरेशन नाव दिलं जातंय, मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपवर उलटणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितलं. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर असल्याचे ते म्हणाले. 

आता हिंदू त्यांना जाब विचारतील

उद्धव ठाकरे म्हणाले की, येत्या रविवारी 5 तारखेला सायंकाळी चारच्या सुमारास दादरमध्ये एकेकाळी जो कबुतरखाना होता, तिथे एक मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरासमोर तमाम हिंदूंना, ज्यांना ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आलंय म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. पक्ष वगैरे न बघता, जे जे रामभक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारावासा वाटतोय, ते सगळे जण तिकडे जमतील. मी स्वतः तिकडे जाणार आहे, माझ्यासोबत शिवसेनेचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, आणि मी तर म्हणेन केवळ शिवसैनिकच नाही तर तमाम रामभक्त असतील, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत, ते हिंदू असतील तर येऊ शकतील. आम्ही ‘राम रक्षा आंदोलन’ करतो आहोत. आता हिंदू जागे झालेत, आता हिंदू त्यांना जाब विचारतील. तर जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे राम रक्षा म्हणू, हनुमान स्तोत्र म्हणू आणि हनुमान चालीसा सुद्धा म्हणू, असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *