‘3 जणांनी पळवलं, धाब्यावरून सुटलो…’; 14 वर्षांच्या मुलाचा थरारक बनाव, खरं कारण ऐकून सर्वजण शॉक | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Nagpur News: नागपुरात एका १४ वर्षांच्या मुलाने घरून पळ काढून स्वतःच्याच अपहरणाचा थरारक बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

News18
News18

नागपूर : एका 14 वर्षांच्या शाळकरी मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. एका वेब सीरिजमधील ‘काल्पनिक साधू’च्या शोधात हा मुलगा घरच्यांना न सांगता थेट नर्मदापूरमला गेला होता. मात्र तिथून परतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

काय आहे नेमकी घटना?

संबंधित मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र तो संध्याकाळपर्यंत घरी परतलाच नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी तातडीने पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

दरम्यान संध्याकाळी हा मुलगा जेव्हा स्वतःहून घरी परतला तेव्हा त्याने घरच्यांना एक थरारक कहाणी सांगितली. शाळेत जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी माझे अपहरण केले होते. त्यांनी मला एका धाब्यावर डांबून ठेवले होते. तिथून मी कसाबसा चकवा देऊन पळून आलो, असा दावा त्याने केला.

सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलाने सांगितलेली अपहरणाची गोष्ट पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले. तो मुलगा सायकलवरून मेट्रो स्टेशनपर्यंत गेला तिथे त्याने आपली सायकल पार्क केली आणि तो स्वतःहून मेट्रोमध्ये बसून निघून गेल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसले.

वेब सीरिजच्या नादापायी नर्मदापूरमचा प्रवास

पोलिसांनी जेव्हा मुलाला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली तेव्हा त्याने सत्य कबूल केले. त्याने नुकतीच एक वेब सीरिज पाहिली होती. त्या सीरिजमधील एका ‘काल्पनिक साधू’च्या पात्राचा त्याच्या मनावर एवढा पगडा बसला की, तो त्या साधूच्या शोधात नागपूरवरून रेल्वे पकडून थेट मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथे पोहोचला.

तिथे खूप शोध घेऊनही असा कोणताही साधू न भेटल्याने तो निराश होऊन नागपूरला परत आला. घरच्यांच्या ओरड्यापासून आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने अपहरणाचा हा खोटा बनाव रचला होता. घरी आल्यानंतर आपल्याला काही ‘आभास’ होत असल्याचेही त्याने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *