Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? ज्यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळेंनी बनवला सिनेमा – Marathi News | Who was khashaba jadhav won first individual olympic medal for independant india satara district nagraj manjule making biopic


Khashaba : कोण होते खाशाबा जाधव? Image Credit source: Instagram

नागराज मंजुळे हे जेव्हा एखादा विषय हाती घेतात, तेव्हा त्याची सर्वोत्तम मांडणी चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर करतात. म्हणूनच ‘फँड्री’, ‘सैराट’ यांसारखे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही गाजले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छापसुद्धा सोडली. आता नागराज आणखी एक दमदार विषय घेऊन नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. ‘खाशाबा’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला. जवळपास दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकारांची फळी, अजय-अतुलचं मनाला भिडणारं संगीत आणि मुख्य अभिनेत्याची झलक पहायला मिळाली. या टीझरनंतर खाशाबा जाधव यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. जवळपास 70 वर्षांपूर्वी कोणत्याही अपेक्षा आणि मदतीशिवाय खाशाबा यांनी हेलसिंकीच्या थंडीत भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून आणलं होतं.

कुस्तीचे धडे

खाशाबा यांचा जन्म सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील गोलेश्वर गावात झाला. आजही कराडमधील कार्वे गावाच्या वेशीवरच खाशाबा जाधव यांच्या नावाने उभारलेला स्मृतिस्तंभ दिसतो. मुंबईतला नोकरीचा काळ वगळला तर बहुतांशी ते याच गावी राहिले होते. 1952 सालच्या फिनलँडमधील हेलसिंकी इथल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 57 किलोग्रॅमखालील वजनी गटातल्या कुस्तीत कांस्यपदक मिळवून ते जेव्हा या गावी परतत होते, तेव्हा साताऱ्यापासून कराडमार्गे थेट या गावापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात दीडशे ते दोनशे बैलगाड्या समाविष्ट झाल्या होत्या. खाशाबा यांचे वडील दादासाहेब जाधव हे नावाजलेले पैलवान होते. खाशाबांना त्यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासूनच कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे घरात आधीपासूनच कुस्तीचंच वातावरण होतं. मात्र खाशाबा हे फक्त कुस्तीतच नाही तर धावणे, मल्लखांब आणि स्विमिंग यांसारख्या इतर खेळांमध्येही निपुण होते. पण त्यांना कुस्तीत विशेष रस होता.

पॉकेट डायनॅमो

कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना खाशाबा हे बाबुराव बलावडे आणि बेलापुरे गुरूजी यांच्याकडून कुस्तीचे डावपेच शिकले. त्यावेळी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी असंख्य बक्षिसे पटकावली होती. पुढे खाशाबा यांना लंडन इथं होणाऱ्या 1948 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्ती खेळण्यासाठी सहभागी केल्याचं जाहीर झालं. तेव्हा खाशाबा यांच्या संपूर्ण प्रवासखर्चाची जबाबदारी छत्रपती शहाजी राजे (द्वितीय) यांनी उचलली होती. मॅटवर किंवा आधुनिक कुस्ती खेळण्याची खाशाबा यांची खासियत नव्हती. शिवाय ऑलिम्पिक स्पर्धेतल्या फ्री स्टाइल कुस्तीचे नियम आणि अटी हे भारतातल्या नियम आणि अटींपेक्षा वेगळे असल्याने ते सर्वप्रथम शिकून घेणं गरजेचं होतं. त्यावेळी अमेरिकन प्रशिक्षक रीस गार्डनर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. खाशाबा हे ‘पॉकेट डायनॅमो’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

जिगरबाज कामगिरी

लंडन ऑलिम्पिकमधील पहिल्याच फेरीत खाशाबा यांनी बर्ट हॅरिस या ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर मल्लाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आणखी एका अमेरिकन मल्लालाही त्यांनी सहज हरवलं होतं. मात्र एका इराणी मल्लाकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. या अपयशानंतर खचून न जाता त्यांनी आणखी जोमाने सराव केला. पुढे त्यांनी जी कामगिरी केली, त्याची इतिहासात नोंद झाली. जपानच्या शोहाची इशी या पैलवानासमोर खाशाबांनी चांगली लढत दिली. तरीही त्यांनी 0-3 अशी हार पत्करावी लागली आणि कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. हेलसिंकीच्या त्याच ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने भारताला हॉकीमधलं पाचवं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. मात्र तरीही त्या दिवसाची ब्रेकिंग न्यूज ही खाशाबा जाधव यांच्या कांस्यपदकाची होती. खाशाबा यांच्यानंतर वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी भारताला 1996 साल उजाडावं लागलं. तर कुस्तीतील पदकासाठी आणखी 56 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. यावरून खाशाबा यांच्या जिगरबाज कामगिरीचं मोल लक्षात येतं.

पोलीस खात्यात सेवा

भारतात परतल्यानंतर त्यांनी आधी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. खाशाबा यांच्या कुस्तीकौशल्याचा उपयोग पोलीस दलाला होऊ शकतो, हे जाणून भारतीय पोलीस सेवेतील त्यावेळचे वरिष्ठ अधिकारी नारायण कामटे यांनी त्यांची पोलीस खात्यात नियुक्ती केली. मुंबईच्या पोलीस खात्यात खाशाबा यांनी 28 वर्षे सेवा केली आणि निवृत्तीनंतर ते पत्नी-मुलासह मूळ गावी परतले.

निवृत्तीनंतरच्या काळात खाशाबा यांना कुस्तीच्या क्षेत्रात खूप काही करायचं होतं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. 14 ऑगस्ट 1984 रोजी खाशाबा काही कारणास्तव कराडला किंवा अन्य कुठेतरी जायला बाहेर पडले होते. एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना मोटारसायकलवर आपल्या मागे बसवलं. वेगात चाललेली ती मोटारसायकल अचानक घसरून पडली आणि मागे बसलेले खाशाबा रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि मेंदुतून रक्तस्राव सुरू झाला. वयाच्या 59 व्या वर्षी या ऑलिम्पिक वीराचा अनपेक्षित अंत झाला. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे 2000 साली त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

पद्म पुरस्कारासाठी लढा

खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी कुस्तीवीर खाशाबा जाधव फाऊंडेशनच्या वतीने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. खाशाबा यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. 2017 मध्ये खाशाबा यांच्या पद्मविभूषण पुरस्काराची फाइल अचानक गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने अखेर रणजित यांनी न्यायालयात धाव घेतली होती. रणजित जाधव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र सरकारला सुनावलं होतं. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे हा सन्मान इतकी वर्षे रखडल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने खाशाबा जाधव यांच्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यास सांगितलं होतं.

आता नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा होऊ लागली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक कसं मिळवलं, हा भारतीय क्रीडाक्षेत्रातील अभिमानास्पद प्रवास मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात साकारण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *