Vaibhav Sooryavanshi IND vs ENG 2nd T20I : इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला आहे. येथे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (4 जुलै) खेळवला जाणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर भारतीय संघाच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादाचे कारण 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ठरला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवात वैभव सूर्यवंशीपासून होते. त्याचा स्टायलिश चष्मा, जबरदस्त स्वॅग (SWAG) आणि संघासोबतचा त्याचा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला. मात्र, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर बीसीसीआयवर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या टी-20 सामन्यात वैभवला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
Durham ➔ Manchester 📍#TeamIndia on the move for 2️⃣nd #ENGvIND T20I 🚌 pic.twitter.com/XDdIUrzycE
— BCCI (@BCCI) July 3, 2026
चाहत्यांनी बीसीसीआयला केले ट्रोल
बीसीसीआयच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेक चाहत्यांनी लिहिले की, जर व्हिडिओची सुरुवात वैभवने होऊ शकते, तर दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या फलंदाजीची सुरुवातही वैभवनेच करायला हवी. दुसऱ्या एका चाहत्याने बीसीसीआयवर निशाणा साधत लिहिले, “वैभवला खेळवणार नाही, पण सुरुवात मात्र त्याच्यापासूनच करणार.” काही युझर्सचे तर असे मत होते की वैभवचा वापर केवळ लोकप्रियतेसाठी (Views मिळवण्यासाठी) केला जात आहे. एकाने कमेंट केली, वैभव भाईला फक्त व्ह्यूज आणि तिकीट विक्रीसाठी संघात ठेवले आहे.”
पदार्पणासाठी चाहत्यांची आग्रही मागणी
दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी चाहते सातत्याने वैभवला संघात स्थान देण्याची मागणी करत आहेत. सोशल मीडियावर “वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात पदार्पण करणार”, “वैभव उद्या खेळणार” आणि “पुढच्या सामन्यात वैभवची निवड नक्की व्हावी”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काही चाहत्यांनी तर भारताच्या भविष्यातील सलामीच्या जोडीची कल्पनाही केली आहे. एका युझरने लिहिले, “विचार करा, जर वैभव आणि अभिषेक यांनी मिळून ओपनिंग केली तर काय होईल…” तर एका मजेशीर कमेंटमध्ये लिहिले होते, “अभिषेक, ईशान आणि वैभव हे तिघेही बॅकबेन्चर्ससारखे मागेच बसले आहेत.”
“तिलकच्या जागी रिंकूला खेळवा”, सूर्यकुमारचीही आठवण
वैभव सूर्यवंशीव्यतिरिक्त चाहत्यांनी संघाच्या संयोजनावर (Team Combination) देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरच्या मते, टी-20 संघात तिलक वर्माच्या जागी रिंकू सिंगला संधी मिळायला हवी. याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये काही चाहत्यांनी भारताचा माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवची आठवण काढली आणि मैदानावरील त्याची उणीव भासत असल्याचे म्हटले. एकंदरीत, वैभव सूर्यवंशीबाबत क्रिकेट चाहत्यांमधील उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्या सामन्यात संधी न मिळूनही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा त्याचीच होत आहे. आता सर्वांचे लक्ष मँचेस्टरमधील दुसऱ्या टी-20 सामन्याकडे लागले आहे की, संघ व्यवस्थापन या युवा फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देते की नाही.
हे ही वाचा –