Moshi Building Collapse: ‘काहीतरी चमत्कार घडेल अन् माझा भाऊ जिवंत असेल’; मोशी दुर्घटनेत अडकलेल्या महेशच्या भावाचा काळीज चिरणारा आक्रोश


Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोत घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेला अनेक तास उलटून गेले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य (Rescue Operation) सुरू आहे. जसजसा वेळ पुढे सरकतोय, तसतशी बाहेर थांबलेल्या नातेवाईकांची धाकधूक आणि चिंता वाढत चालली आहे. या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगरचा 32 वर्षीय तरुण महेश कुंभार हा देखील इमारतीमध्ये अडकला असून, “आता एखादा चमत्कार घडावा आणि माझा भाऊ जिवंत असावा,” अशी आर्त साद त्याचा भाऊ संतोष कुंभार याने देवाकडे घातली आहे.

Moshi Building Collapse: एमबीएचे शिक्षण आणि वर्षभरापूर्वीच लागली होती नोकरी

मिळालेल्या माहितीनुसार, महेश कुंभार हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे. त्याने आपले एमबीएचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या आशेने तो वर्षभरापूर्वीच मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात एचआर म्हणून रुजू झाला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना काल दुपारच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत महेश प्रशासकीय इमारतीमध्येच अडकला.

Moshi Building Collapse: मध्यरात्री दीड वाजता आला कंपनीचा फोन

बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली असली, तरी महेश इमारतीत अडकल्याची धक्कादायक माहिती त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात्री दीड वाजता कंपनीकडून फोन करून देण्यात आली. हा फोन येताच कुंभार कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हापासून महेशला मोबाईलवर संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याचा फोन लागत नसल्याने कुटुंबाची चिंता अधिकच वाढली.

Moshi Building Collapse: “काहीतरी चमत्कार घडेल आणि माझा भाऊ जिवंत असेल…”

भाऊ संकटात असल्याचे समजताच महेशचा भाऊ संतोष कुंभार तातडीने रात्रीच छत्रपती संभाजीनगरहून प्रवासाला निघाला आणि तातडीने दुर्घटनास्थळी पोहोचला. आपला भाऊ सुरक्षित असेल, या आशेने आणि विचाराने तो घटनास्थळी आला होता; पण महेश अद्यापही इमारतीमध्येच अडकून असल्याची अधिकृत माहिती त्याला बचाव पथकाकडून देण्यात आली. आपल्या डोळ्यांसमोर कोसळलेली ती तीन मजली इमारत पाहून संतोष कुंभार पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आता काहीतरी चमत्कार घडेल आणि आपला भाऊ जिवंत असेल, अशी आशा संतोष आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आहे.

दरम्यान, एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महेशसह इतर कामगारांचा शोध घेत असून, कुंभार कुटुंबाचे डोळे आता फक्त आणि फक्त महेशच्या सुखरूप बाहेर येण्याकडे लागले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Moshi Building Collapse: ‘आत कचऱ्याची प्रचंड उष्णता, विषारी वायू अन्…’; मोशीत जवानांनी जीव धोक्यात घालून कसं केलं बचावकार्य? अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *