सर्वांना बेधुंद करणारं ‘सुपरनोव्हा’! सई ताम्हणकरच्या ‘बोल बोल राणी’चं पहिलं गाणं; मराठीतील एकदम वेगळं आणि भन्नाट | ताज्या मनोरंजन बातम्या


सामान्य प्रेमगीतांच्या चौकटीपलीकडे जाणारं ‘सुपरनोव्हा’ हे गाणं ऐकण्याबरोबरच अनुभवण्यासाठीही आहे. गाण्यात सई ताम्हणकर एका विलक्षण भावविश्वात वावरताना दिसते. तिच्या प्रत्येक नजरेत, प्रत्येक हालचालीत काहीतरी अव्यक्त दडलेलं आहे. दुसरीकडे सुबोध भावे एखाद्या गुंतागुंतीच्या कोड्याचा मागोवा घेत असल्याची झलक दिसते. त्यामुळे हे गाणं फक्त रोमँटिक न राहाता चित्रपटातील रहस्य आणि भावनिक संघर्ष यांना एकत्र गुंफणारा महत्त्वाचा दुवा आहे. गाण्याची प्रत्येक फ्रेम आणि प्रत्येक स्वर प्रेक्षकांना नकळत त्या गूढ विश्वात आणखी खोल घेऊन जातो.

सुपरनोव्हा म्हणजे एका ताऱ्याच्या विस्फोटातून निर्माण होणारं अफाट तेज. याच भावनेचा धागा पकडत हे गाणं प्रेमाच्या अशा टप्प्याची गोष्ट सांगतं, जिथं भावना इतक्या तीव्र होतात की, त्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकतात. त्यामुळे हे गाणं चित्रपटातील रहस्य उलगडत नाही, पण त्या रहस्यामागील भावनिक विश्वाची झलक नक्कीच दाखवते.

दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, “चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा कथेशी जवळचा संबंध आहे आणि ‘सुपरनोव्हा’ त्यातील सर्वात खास आहे. हे गाणं कथेला थांबवत नाही, तर पात्रांच्या मनात काय सुरू आहे, त्यांच्या भावनांचा उद्रेक किती खोल आहे आणि त्यांच्यातील नात्यांचा प्रवास कोणत्या वळणावर उभा आहे, हे सांगतं. ट्रेलरमध्ये ज्या रहस्याची झलक दिसते, त्या रहस्यामागे धडधडणाऱ्या भावनांचा आवाज म्हणजे ‘सुपरनोव्हा’. प्रेक्षकांनी हे गाणं फक्त पाहू नये, तर त्यातील शांतता, अस्वस्थता आणि प्रेमाचा विस्फोट अनुभवावा.”

सुझेन डिमोलाच्या भावपूर्ण आवाजाने सजलेलं हे गाणं, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या आगळ्यावेगळ्या संगीतामुळे आणखी प्रभावी ठरतं. सावरी वर्मा यांनी लिहिलेल्या शब्दांमध्ये प्रेम, ओढ आणि अनामिक अस्वस्थतेचा सुंदर मिलाफ आहे.

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, “सुपरनोव्हा हे नाव जितकं वेगळं आहे, तितकाच त्याचा संगीतप्रवासही वेगळा आहे. या गाण्यात आम्हाला पारंपरिक प्रेमगीताचा सूर नको होता. प्रेम जेव्हा माणसाला आतून बदलतं, त्याला अस्वस्थ करतं, त्याच वेळी त्याला नवीन ऊर्जा देखील देतं, त्या भावनेचा ध्वनी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या गाण्यात शांतताही आहे, धडधडही आहे आणि एक अनामिक गूढताही आहे. कथा पुढे जात असताना या गाण्याचा अर्थ प्रेक्षकांना आणखी खोलवर उमगेल.”

ट्रेलरनंतर आता ‘सुपरनोव्हा’ने ‘बोल बोल राणी’च्या रहस्यमय विश्वाला एक भावस्पर्शी आणि सुरेल आयाम दिला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली असून, पडद्यावर या रहस्याचा उलगडा नेमका कसा होणार याची प्रेक्षकांना आता अधिकच प्रतीक्षा लागली आहे.

सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा रहस्य, थरार आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट 17 जुलै रोजी रिलीज होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *