Who Is Suryansh Shedge : मुंबईचा आणखी एक ‘सूर्या’ टीम इंडियात! आईचा मोठा त्याग ते टीम इंडियाची कॅप… कोण आहे सूर्यांश शेडगे? ज्याने वैभवच्या आधी केला डेब्यू


Who Is Mumbai player Suryansh Shedge : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज बेलफास्ट येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीवरील सुरुवातीच्या हालचालीचा फायदा घेण्यासाठी भारताने प्रथम क्षेत्ररक्षणाचा पर्याय निवडला. दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ज्या दोन तरुणांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यातलं एक नाव म्हणजे मुंबईचा सूर्यांश शेडगे आहे. टीम इंडियाची ब्लू कॅप मिळवण्यामागचा सूर्यांशचा प्रवास एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. मुंबईच्या गल्लीबोळातून निघून थेट आंतरराष्ट्रीय मैदानावर झेप घेणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूची कहाणी कमालीची रंजक आहे.

मुलासाठी आईने सोडली नोकरी

29 जानेवारी 2003 रोजी मुंबईत जन्मलेल्या सूर्यांशमधील क्रिकेटची खरी ठिणगी सर्वात आधी त्याच्या आईने ओळखली. सूर्यांश अवघ्या 9 वर्षांचा असताना त्याच्या आईने एक धाडसी निर्णय घेतला. मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि त्याला पूर्ण वेळ देता यावा, म्हणून त्याच्या आईने स्वतःची चांगली नोकरी चक्क सोडून दिली. मुंबईसारख्या अत्यंत महागड्या आणि स्पर्धात्मक शहरात नोकरी सोडणं हा एक खूप मोठा जुगार होता, पण आईच्या या त्यागाने सूर्यांशच्या प्रवासाला एक नवी दिशा दिली.

137 चेंडू अन् 326 धावा…

मुंबईच्या खडतर क्रिकेट जगतात स्वतःची जागा बनवणे सोपे नव्हते, पण सूर्यांशने आपल्या बॅटने धमाका करायला सुरुवात केली. शालेय क्रिकेटमधील नामांकित गाइल्स शिल्ड अंडर-14 स्पर्धेत त्याने फक्त 137 चेंडूत नाबाद 326 धावांची वादळी खेळी खेळली. या एका खेळीने मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली आणि निवडकर्त्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या.

अंडर-19 वर्ल्डकप हुकला, पण खचला नाही!

पुढे सूर्यांशने मुंबईच्या अंडर-19 संघाचे यशस्वी नेतृत्व केले. मात्र, दुर्दैवाने त्याला भारताच्या अंडर-19 वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नाही. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता, पण तो खचला नाही. त्याच्या या कठीण काळात त्याला भारताचे स्टार कोच अभिषेक नायर यांचे मार्गदर्शन लाभले. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यांशने आपल्या खेळात आणखी धार आणली.

कोहलीला सर्वात मोठा आदर्श

सूर्यांश हा एक अस्सल अष्टपैलू खेळाडू आहे. तो विराट कोहलीला सर्वात मोठा आदर्श मानतो. तसेच, एक परफेक्ट ऑलराउंडर बनण्यासाठी तो हार्दिक पांड्या आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या खेळण्याच्या शैलीचा अभ्यास करतो. मैदानावर हार्दिकसारखी फटकेबाजी आणि स्टोक्ससारखी चिवट वृत्ती दाखवण्याची त्याची ख्याती आहे. 

हे ही वाचा –

IND vs IRE 2nd T20 : सगळे ज्याची वाट पाहत होते, त्यालाच डावललं! शेवटच्या क्षणी मैदानात ‘तिसराच’ ट्विस्ट; कोणालाच सुगावा न लागता टीम इंडियात ‘या’ दोघांचे पदार्पण!





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *