धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय


जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेल्या सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील (Jalgaon) सीलबंद घरात शिडी लावून प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. 

लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर एसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या दोघांना पकडण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रसाद नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अकोल्यातली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेल्या आरोपी लोकसेवक किरण चौधरी याच्या सांगण्यावरून हा घरफोडीचा प्रयत्न झाला होता का?, घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू एसीबीच्या कारवाईपूर्वी हटविण्याचा कट होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. 

दरम्यान, अटकेतील दोन्ही आरोपी हे किरण चौधरीचे नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान घरातून संपर्क नंबर आणि हिशोबाची नोंद असलेली डायरी लांबविण्यासाठीच हा चोरीचा प्रयत्न केला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली असून पुढील सखोल तपास जळगाव पोलीस करत आहेत.

नाशिकमध्ये सोनं चोरणाऱ्या महिलेला अटक, सीसीटीव्हीत घटना कैद

सोन्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून हात सफाईने चोरी करणाऱ्या एका महिलेस अंबड पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या छत्रपती शिवाजी चौक जुने सिडको येथील मोरया ज्वेलर्स या दुकानांमध्ये ही घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सदर महिला दागिने घेण्यासाठी या दुकानात आली होती. त्यावेळी, सेल्समनचे लक्ष विचलित करून या महिलेने दुकानातील तीन अंगठ्या चोरी केल्या होत्या. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमुळे ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. सदर महिलेला कोणी ओळखत असेल व याआधी असा चोरीचा प्रकार कुठे घडला असेल तर त्यांनी अंबड पोलीस स्टेशन नाशिक येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा ‘गद्दार’ डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *