TMC Rebel MP: लोकसभा लढवली नाही, विधानसभेत फक्त ८२२ मते अन् आता थेट २० खासदारांची लॉटरी, कोण आहे NCPI पक्ष? | राष्ट्रीय बातम्या


तृणमूल काँग्रेसच्या बंडखोरांनी थेट एनसीपीआयमध्ये आपला गट विलीन केल्याने अचानक हा पक्ष चर्चेत आला. निवडणूक आयोगाकडे केवळ नोंदणीकृत असलेला आणि त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत अवघी ८२२ मते मिळवणारा हा पक्ष आता देशातील थेट पाचव्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पण, NCPI पक्ष आहे तरी काय, त्याचा इतिहास काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली NDA सोबत काम करणार

बंडखोर गटाच्या नेत्या काकोली घोष यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए (NDA) सोबत मिळून काम करू.” आमच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या एकूण खासदारांपैकी दोन तृतीयांश खासदारांचे संख्याबळ असल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागू होत नाही, असा दावा बंडखोर खासदारांनी केला आहे. या गटातील ज्येष्ठ खासदार सुदीप बंडोपाध्याय आणि शताब्दी रॉय यांनी आमचा गट अधिकृतपणे NCPI मध्ये विलीन झाला असल्याची पुष्टी केली आहे.

पण बंडखोर खासदारांची पसंती ‘NCPI’ लाच का?

तृणमूलच्या एवढ्या मोठ्या खासदारांनी अचानक एका अज्ञात आणि छोट्या पक्षाची निवड का केली? ही ‘NCPI’ पार्टी नेमकी काय आहे, ती कोण चालवतं आणि शून्यावरून थेट देशातील पाचवी सर्वात मोठी पार्टी (खासदारांच्या संख्येनुसार) ती कशी बनली?

NCPI ची स्थापना आणि पार्श्वभूमी:

‘नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) हा त्रिपुरा राज्यातील एक नोंदणीकृत, पण निवडणूक आयोगाची मान्यता नसलेला (Registered Unrecognized) राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी, म्हणजेच २० जानेवारी २०२३ रोजी झाली होती. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘पेनची निब’ हे आहे.

पक्षाची आर्थिक स्थिती आणि नेतृत्व:

निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार, या पक्षाला केवळ १.१३ लाख रुपयांची एकूण देणगी (Donation) मिळाली होती. पक्षाच्या कागदपत्रांवर शेली कुंडू यांचे नाव कोषाध्यक्ष म्हणून नोंदवले गेले असले, तरी त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम पाहतात. शेली कुंडू या बिस्वबाजार प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘पश्चिम बंगा असंगठित महिला कर्मी असोसिएशन’ (सामाजिक संस्था) या दोन संस्थांच्या संचालक देखील आहेत.

पक्षाचा पत्ता आणि शुभेंदु अधिकारी कनेक्शन:

NCPI पक्षाचा नोंदणीकृत पत्ता पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील बानीपूर भागात आहे. पक्षाच्या अध्यक्षा शेली कुंडू यांचे पती उत्तिया कुंडू आहेत. विशेष म्हणजे, उत्तिया कुंडू यांनी पश्चिम बंगालचे भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे या बंडामागे भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

त्रिपुरामधून पहिली निवडणूक आणि थेट गायब!

बंगालमध्ये नोंदणी झालेली असतानाही या पक्षाने २०२३ मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला. त्रिपुरात पक्षाचे काम शांतनू डे पाहत होते. त्रिपुरातील आदिवासी समुदायाला प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने पक्षाने ७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, ४ जागांवर उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले.

त्यामुळे केवळ २ जागांवर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली गेली आणि एका अपक्षाला पाठिंबा दिला गेला. छवामनू मतदारसंघात पक्षाला ५३६ मते आणि कैलाशहर मतदारसंघात केवळ २८६ मते मिळाली. तिसरे उमेदवार कृष्ण कुमार देबबर्मा यांनी अंबासामधून अपक्ष म्हणून लढत ३७६ मते मिळवली. या निवडणुकीनंतर हा पक्ष पूर्णपणे गायब झाला होता.

शून्यावरून थेट २० खासदारांचा प्रवास!

पक्षाचे नेते शांतनू डे यांनी सांगितले की, सुरुवातीला २०२३ ची पश्चिम बंगालची पंचायत निवडणूक लढवण्याचा आमचा विचार होता, पण फंड आणि अंतर्गत वादांमुळे पक्षाचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले होते, पण संसाधनांच्या (पैशांच्या) अभावामुळे ते शक्य झाले नाही.

NCPI ने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवलीही नव्हती, पण आज अचानक या पक्षाकडे २० खासदार आले आहेत. तृणमूल काँग्रेसमधील या ऐतिहासिक बंडामुळे आणि विलीनीकरणामुळे, कालपर्यंत कोणालाही माहीत नसलेला एक छोटा पक्ष आज थेट राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *