Last Updated:
Nashik News: सुखी संसाराची स्वप्न बघून एका महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाचा हिरमूड झाला आहे. पत्नीचा भूतकाळ ऐकून त्याला धक्काच बसला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील एका तरुणासोबत विचित्र प्रकार घडला आहे. त्याने सुखी संसाराची स्वप्न बघून एका महिलेशी लग्न केलं होतं. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. नवरीला घरी घेऊन जाण्याआधीच त्याच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. त्याची पत्नी अचानक बेपत्ता झाली. ज्यावेळी तरुणाने तिच्याबाबत चौकशी केली. तेव्हा तिचा भूतकाळ ऐकून नवरदेव हादरला आहे.
नेमकं काय घडलं?
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील रहिवासी असलेले २४ वर्षीय विशाल जयवंत धावणे हे शेती व्यवसाय करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासाठी वधूचा शोध सुरू होता. याच दरम्यान त्यांचा संपर्क एका मॅरेज एजंटशी आला. या एजंटने विशाल यांच्यासाठी एका मुलीचे स्थळ सुचवले आणि तिची ओळख करून दिली. ती मुलगी अविवाहित असल्याचे एजंट आणि तिच्या कथित नातेवाईकांनी भासवलं.
दोन्ही बाजूने बोलणी झाल्यानंतर विवाह ठरवण्यात आला. यासाठी ठरल्यानुसार एजंटला ५० हजार रुपये आणि वधूच्या वडिलांना २ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण ३ लाख रुपयांची रक्कम देण्याचं निश्चित झालं.
कसबे वणी येथील मंदिरात लग्न
सर्व काही ठरल्यानंतर, ७ जून २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील एका मंदिरात हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. लग्न लागल्यानंतर नवरदेव आपल्या नवीन नवरीला घेऊन सोलापूरकडे येण्यासाठी निघाला. मात्र, प्रवासादरम्यान एके ठिकाणी नवरीने बहाणा करून गाडी थांबवायला लावली. ती वाहनातून खाली उतरली. त्यानंतर ती अचानक तिथून गायब झाली.
नवरी अचानक गायब झाल्याने घाबरलेल्या विशाल यांनी सर्वत्र शोध सुरू केला आणि कसून चौकशी केली. या चौकशीत जी माहिती समोर आली, त्याने विशाल यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या महिलेशी त्यांनी लग्न केले होते, तिचा यापूर्वीच विवाह झालेला असून ती चक्क तीन मुलांची आई होती, अशी माहिती समोर आली. बायकोचा भूतकाळ ऐकून नवरा पुरता हादरला. ही सर्व माहिती लपवून विशाल यांची फसवणूक करण्यात आली होती.
९ जणांवर गुन्हा दाखल, टोळी सक्रिय असण्याची शक्यता
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विशाल धावणे यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या फिर्यादीनुसार, नऊ जणांच्या टोळीने संगनमताने हा फसवणुकीचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणी बापू अंधारे यांच्यासह काही अनोळखी एजंट, महिला आणि पुरुषांसह एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यातील एका संशयित महिलेला अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या टोळीने यापूर्वीही अनेक तरुणांना अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून लुटल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
Nashik,Maharashtra
Jun 15, 2026 11:34 AM IST
