Fatima Sana Statement Ind vs Pak Womens T20 World Cup 2026 : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात निराशेचे वातावरण आहे. 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 106 धावांवर गारद झाला. या एकतर्फी पराभवानंतर पाकिस्तानची युवा कर्णधार फातिमा सना हिने संघाच्या कामगिरीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, तिने या पराभवासाठी सीनियर खेळाडूंच्या चुका आणि खराब क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले.
सीनियर खेळाडूंवरच फोडलं पराभवाचं खापर (Ind vs Pak Womens T20 World Cup 2026)
सामन्यानंतर बोलताना फातिमा सना म्हणाली की, सामन्यात सोडलेले झेल पाकिस्तानसाठी महागात पडले. तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कॅच सामना जिंकवतात आणि कॅच सामन पण हरवतात. दुर्दैवाने आम्ही अनेक महत्त्वाचे झेल सोडले. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या चुका अनुभवी आणि सीनियर खेळाडूंकडून झाल्या. पुढील सामन्यांमध्ये आम्हाला गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही मोठी सुधारणा करावी लागेल.” तिच्या मते, मैदानावरील अशा चुका अखेर सामन्याचा निकाल बदलतात आणि संघाला मोठी किंमत मोजावी लागते.
फातिमाने संघाच्या फलंदाजीबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली. तिच्या मते, पाकिस्तानने सुरुवात चांगली केली होती आणि पॉवरप्लेमध्ये भारताला टक्कर दिली होती. मात्र त्यानंतर संपूर्ण डाव कोलमडला. ती म्हणाली, “आमची फलंदाजी अत्यंत निराशाजनक होती. पॉवरप्लेपर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण त्यानंतर फलंदाज एकामागोमाग बाद होत गेले आणि संपूर्ण डाव कोसळला. आगामी सामन्यांमध्ये आम्हाला फलंदाजीची पातळी उंचावावी लागेल.”
अखेरच्या षटकांत भारताने घेतला फायदा (Fatima Sana Statement Ind vs Pak)
भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकांत केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांवर दबाव वाढला. याबाबत बोलताना फातिमा म्हणाली की, “पहिल्या 15 षटकांपर्यंत आम्ही सामन्यात होतो. पण नंतर आम्ही अतिरिक्त धावा दिल्या आणि भारताने त्याचा पुरेपूर फायदा घेतला.” तिने स्लो ओव्हर-रेटबाबतही स्पष्टीकरण दिले. नियमांनुसार पाकिस्तानला एका क्षेत्ररक्षकाला 30 यार्ड वर्तुळाच्या आत आणावे लागले होते, ज्याचा भारताला फायदा झाला.
फातिमा म्हणाली, “भारताच्या डावखुऱ्या-उजव्या फलंदाजांच्या संयोजनामुळे आमच्या क्षेत्ररक्षणाच्या मांडणीत वारंवार बदल करावे लागले. आमचा संघ युवा आहे आणि अशा परिस्थितीतून खेळाडू अनुभव घेत आहेत. पुढील सामन्यांत ते अधिक परिपक्वपणे खेळतील.”
आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची भीती
भारताविरुद्धच्या या मोठ्या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. फातिमा सनानेही याची कबुली दिली. ती म्हणाली, “हा पराभव निश्चितच चिंताजनक आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्हाला पुढील सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. अजून स्पर्धेत बराच प्रवास बाकी आहे, पण पुढचा मार्ग खूप कठीण असणार आहे.” पाकिस्तानसमोर आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघांचे आव्हान आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला