Solapur Sairat Fame Arbaaz Shaikh Tukaram Mundhe Action: ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेख ( Arbaaz Shaikh) सध्या चर्चेत आहे ते त्याच्या इन्स्टा पोस्टमुळे.अभिनेता अरबाज याने या व्हिडिओमध्ये (Arbaz Shaikh Video) त्याच्या वडीलांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. ज्या रुग्णालयात त्याच्या वडिलांना दाखल करण्यात आलं आहे, त्या सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर (Solapur Nobel Hospital) मनमानी कारभारावरून त्यांनी रडत रडत व्हिडिओ केलेला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ‘सैराट’ फेम अभिनेत्याने केलेल्या आरोपांची अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली गंभीर दखल घेतली असून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या एफडीएने तातडीने सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलवर धाड टाकली. रुग्णालय परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाला गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमधून तातडीने औषध विक्री थांबवण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत.
तुकाराम मुंढेंच्या एफडीएने लगेच सोलापूरच्या हॉस्पिटलवर धाड टाकली अन्…
काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढेंनी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषधं आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्याच आत असणाऱ्या अधिकृत फार्मसीमधून (मेडिकल) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर करावाईचा इशारा दिलेला. तरीसुद्धा रुग्णालयानं असं केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं. तसेच, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेलं. रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी FDA कडे केलेली. अशातच आता अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढेंचं पथक रुग्णालयात दाखल झालं.त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान नोबेल हॉस्पिटल परिसरात पाहणी केल्यानंतर अन्न व औषध विभागाला या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या.
अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करतं नोबल हॉस्पिटलने हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषध घेणे बंधनकारक केले असल्याचा आरोप केला होता.या व्हिडिओची दखल घेत सोलापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांनी नोबल हॉस्पिटलची पाहणी केली.हॉस्पिटल परिसरात असलेल्या फातिमा फार्मसीमध्ये अन्न आणि औषध विभागाकडून तपासणी करण्यात आलीय.या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याने तातडीने औषध विक्री बंद करण्याचे आदेश देत असल्याची माहिती अन्न आणि औषध विभागाने दिली आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज शेख काय म्हणालेला?
अरबाज शेख व्हिडीओमध्ये म्हणालेला की, “नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले… त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचं, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…”
अरबाजच्या आरोपांवर रुग्णालयाचं म्हणणं काय?
‘सैराट’ फेम सल्या म्हणजे, अरबाज शेख यानं सोलापुरातील ज्या नोबल हॉस्पिटलवर आरोप केलेले, त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न देखील एबीपी माझानं केलाय. नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी अरबाज यानं केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केलाय. “अरबाज शेख याचे वडील अत्यंत सिरीयस स्थितीत हॉस्पिटलला आले होते. ते केवळ काही तास हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांना गरज असलेलीच औषध देण्यात आली होती. त्यासाठी आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्यायला कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, अरबाज यानं हे आरोप का केलेत? याची कल्पना आम्हाला नाही…”, असा दावा त्यांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना केलाय. मात्र, या संदर्भात स्वतः कॅमेरासमोर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.