Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्… भयानक कट समोर


पुणे: दौंड तालुक्यातील खामगाव येथील एक खळबळजनक आणि तितकाच क्रूर प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. एका २३ वर्षीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह कारमधून नेऊन वाघोली-राहू रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक रस्ते अपघात असल्याचा बनाव आरोपींनी रचला होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत हा सगळा कट उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुऱ्हाळ मालक, जेसीबी चालक आणि मालकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News :  नेमकी घटना काय?

रामू शंभू पासी (वय २३, मूळ रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) हा तरुण एप्रिल २०२६ पासून खामगाव येथील ‘गाडीमोड’ परिसरातील एका गुऱ्हाळावर मजूर म्हणून काम करत होता. १९ जूनच्या मध्यरात्री गुऱ्हाळावर जेसीबीचे काम सुरू होते. यावेळी चालक आलम याने निष्काळजीपणाने जेसीबी चालवला, ज्यामुळे तिथे झोपलेल्या रामू पासीच्या अंगावरून थेट जेसीबी गेला. या भीषण दुर्घटनेत रामूचा जागीच मृत्यू झाला.

Pune Crime News :  पुरावा नष्ट करण्यासाठी धमकी आणि मृतदेहाची विल्हेवाट

अपघातानंतर पोलिसांना कळवण्याऐवजी आरोपींनी गुन्हा लपवण्याचा कट रचला. जेसीबी मालकाने गुऱ्हाळावरील इतर मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून रामूचा मृतदेह एका कारच्या डिकीत कोंबला. पहाटेच्या सुमारास त्यांनी हा मृतदेह वाघोली-राहू रस्त्यावर नेऊन टाकला, जेणेकरून त्याचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे असे दाखवता येईल.

Pune Crime News :  भावाच्या शोधमोहिमेमुळे पाप आले उघड

रामू अचानक गायब झाल्याचे कंत्राटदार तमेरेज फरीदी यांनी त्याच्या उत्तर प्रदेशातील कुटुंबीयांना फोन करून सांगितले. त्यानंतर रामूचा भाऊ राजू पासी तातडीने दौंडमध्ये दाखल झाला. दोन दिवस त्याने भावाचा सर्वत्र शोध घेतला. २१ जून रोजी जेव्हा तो गुऱ्हाळावर चौकशीसाठी गेला, तेव्हा तिथल्या लोकांच्या वागण्यावरून त्याला संशय आला. राजूने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. यवत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करताच हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Pune Crime News :  गुऱ्हाळ मालकाला पोलीस कोठडी; पाच जणांवर गुन्हे

या प्रकरणी मृत मजुराचा भाऊ राजू पासी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जेसीबी मालक अविनाश बाळासाहेब यादव, गणेश हरिभाऊ जगताप, कल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार आणि चालक आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर अपघाताची माहिती पोलिसांपासून दडवून ठेवल्याप्रकरणी गुऱ्हाळ मालक नाथाजी कोळपे याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *