Ketan Agrawal Case : केतनला संपवण्याच्या कटाची ‘त्या’ तिसऱ्या तरुणाला पूर्ण कल्पना! चेतनच्या मित्राला पुणे पोलिसांनी उचललं, बीड कनेक्शन उघड, त्याने…


पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या क्रूर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे रोज नवे आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. आता या संपूर्ण हत्या प्रकरणात आणि खुनाचा कट रचण्यामध्ये आणखी एका तिसऱ्या तरुणाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र (Classmate) असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली असून, त्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Ketan Agrawal Case : खुनाचे ‘प्लॅनिंग’ आधीच केले होते डिस्कस!

मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट किती पूर्वनियोजित होता, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. आरोपी चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल या दोघांनी मिळून हत्येचा संपूर्ण आराखडा (Planning) या वर्गमित्रासोबत आधीच डिस्कस म्हणजेच शेअर केला होता. इतकेच नाही तर, गुन्ह्याच्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी केतनला ज्या लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्यात आले, तिथे सोबत चालण्यासाठी चेतन आणि सियाने या मित्राकडे वारंवार आग्रह धरला होता. मात्र, काही कारणास्तव तो तरुण १८ जून रोजी त्यांच्यासोबत लोहगडावर गेला नाही आणि एका मोठ्या गुन्ह्यात थेट सहभागी होण्यापासून वाचला.

Ketan Agrawal Case : हत्या केल्यानंतर चेतन सर्वात आधी ‘त्यालाच’ भेटला!

या प्रकरणातील सर्वात खळबळजनक आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, लोहगडावर केतन अग्रवाल यांचा दरीत ढकलल्यानंतर आरोपी चेतन चौधरी हा इतर कोणालाही न भेटता थेट याच आपल्या वर्गमित्राला जाऊन भेटला होता. केतनचा खून केल्याची कबुली किंवा माहिती त्याने सर्वप्रथम याच मित्राला दिल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ चेतनच नाही, तर दुसरी मुख्य आरोपी सिया गोयल हिने देखील या तरुणाशी संपर्क साधून संवाद साधला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Ketan Agrawal Case : कोण आहे हा तिसरा तरुण? ‘बीड’ कनेक्शन समोर

पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा संशयित तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. तो सध्या पुण्यात स्थायिक असून बालेवाडी परिसरातील एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो सतत आरोपी चेतन चौधरीच्या संपर्कात होता. त्यांच्यात नियमित संवाद सुरू होता आणि याच काळात केतनला संपवण्याचा कट रचला जात होता.

Ketan Agrawal Case : “खून करू नका…” तरुणाने दिला होता सल्ला?

पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान या तरुणाने पोलिसांना एक महत्त्वाचा दावा केला आहे. चेतन आणि सिया जेव्हा केतनच्या खुनाचा प्लॅन आखत होते, तेव्हा “केतनचा खून करू नका, असे पाऊल उचलणे महागात पडेल,” असा सल्ला आपण त्या दोघांना दिला होता, अशी माहिती या तरुणाने पोलिसांना दिली आहे.

जरी या तरुणाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला असला, तरी एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचला जात आहे हे माहीत असूनही त्याने ही माहिती पोलिसांपासून का लपवली? गुन्ह्याची माहिती असून ती दडपल्याप्रकरणी त्याच्यावर काय कारवाई होणार? आणि हत्येनंतर चेतन त्याला का भेटला? या सर्व बाबींचा शोध आता पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत. या नव्या खुलाशामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *