IND vs ENG 2nd T20I Playing XI : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर ‘या’ खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?


IND vs ENG, 2nd T20I Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला आणि क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. त्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या पदार्पणाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता सर्वांच्या नजरा 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यावर लागल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात वैभवला पदार्पणाची संधी मिळणार का? आणि जर त्याला संघात स्थान दिले, तर कोणाचा पत्ता कट होणार? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते आणि माजी दिग्गज खेळाडू वैभवने लवकरात लवकर पदार्पण करावे अशी इच्छा व्यक्त करत असले, तरी टीम मॅनेजमेंट सध्या घाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. परंतु, जर दुसऱ्या टी-20 मध्ये बदल करायचा झाल्यास संजू सॅमसनऐवजी दुसऱ्या एका खेळाडूवर टांगती तलवार असू शकते.

तिलक वर्मा की संजू सॅमसन… कोणाचे स्थान धोक्यात?

वैभव सूर्यवंशी संघात आल्यास प्रत्येक जण संजू सॅमसनला बाहेर करण्याचा सल्ला देत आहे. मात्र, या शर्यतीत तिलक वर्माचे नाव मागे का पडत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तिलक सलामीला फलंदाजी करत नाही हे त्याचे मुख्य कारण असले, तरी सध्याच्या फॉर्मच्या जोरावर तिलक वर्मा रडारवर येऊ शकतो. जर संघात संतुलन राखायचे असेल, तर संजू सॅमसन खालच्या क्रमांकावरही सहज फलंदाजी करू शकतो, तर वैभव सूर्यवंशी कोणतीही अडचण नसताना सलामीवीराची भूमिका चोख बजावू शकतो. केवळ काही वर्षांपूर्वी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर तिलक संघात आपले स्थान टिकवून आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनने काही महिन्यांपूर्वीच तीन महत्त्वपूर्ण खेळी खेळून भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. असे असूनही नेहमी संजूलाच लक्ष्य केले जाते, जे चुकीचे समीकरण आहे.

आकडेवारी काय सांगते? (दोघांच्या शेवटच्या 24 डावांची तुलना)

सध्याचा फॉर्म आणि आकडेवारी पाहिल्यास तिलक वर्मा संजू सॅमसनपेक्षा खूप मागे असल्याचे स्पष्ट दिसते. संजू सॅमसनने 24 डावात 544 एकूण धावा केल्या, ज्यात 169 चा स्ट्राईक रेट आहे. दुसरीकडे तिलक वर्माने 24 डावात 143 स्ट्राईक रेटने 345 धावा केल्या.

गौतम गंभीर काय निर्णय घेणार?

खेळाडूंची निवड ही त्यांच्या जुन्या प्रतिष्ठेवरून नव्हे, तर सध्याचा फॉर्म आणि संघातील त्यांची भूमिका यावर आधारित असायला हवी. या न्यायाने तिलक वर्मा सध्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र दिसत नाही. आता 4 जुलैला मँचेस्टरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार जुन्याच प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरतात, की वैभव सूर्यवंशीला संधी देण्यासाठी तिलक वर्माला ड्रॉप करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे ही वाचा –

Cristiano Ronaldo Retirement : फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *