Dyanada Ramtirthekar Smoking Experience: ‘ठिपक्यांची रांगोळी’ , ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dyananda Ramtirthkar) तिच्या निखळ अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकते. अनेक वेब सिरीज आणि मालिकांमधून आणि नाटकांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आजकाल ओटीटीमध्ये सर्रास सगळे कलाकार काम करताना दिसतात. पण OTT माध्यमात अनेकदा येणारा भडकपणा आणि इंटिमेट सीन, धूम्रपान यासारख्या गोष्टींमुळे कलाकारांना या सगळ्या सीन्ससोबत जुळवून घ्यावे लागते. विशेषतः अभिनेत्रींना बऱ्याचदा कथानकाची गरज म्हणून असे सीन करावे लागतात. असंच काहीसं ज्ञानदा रामतीर्थकर सोबत झालं. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने धूम्रपानाच्या सीन वेळी तिने घरच्यांना कसं विश्वासात घेतलं याविषयी सांगितलं. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिच्यासमोर ठेवलेल्या अटीविषयीही ती बोलली आहे.
काय म्हणाली ज्ञानदा रामतीर्थकर?
ज्ञानदा रामतीर्थकरणे आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.केवळ मालिकांमध्येच नाही तर एका वेब सिरीजमध्ये काम केल्याचा अनुभव तिने चाहत्यांशी शेअर केला. या वेब सिरीजमध्ये तिला सिगारेट ओढण्याचा एक सीन करायचा होता.पण हा सीन करण्याआधी तिला इतका संकोच वाटला की तिने तिच्या आई-वडिलांची परवानगी घ्यायचं ठरवलं.कुठलीही कलाकृती जाहिरात करण्यापूर्वी घरच्यांना तिने केलेलं काम पाहिल्यानंतर काय वाटेल याचा ती विचार करत असल्याचं ज्ञानदाने ‘बी द लाईट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली ‘ नवीन प्रोजेक्ट बद्दल मी त्यांच्याशी चर्चा करते आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाची असते.एकदा एका मराठी वेब सिरीज साठी मला धूम्रपान करण्याचा सीन करायचा होता.मी त्यांना सांगितलं होतं आणि मला आठवतंय की माझे वडील म्हणाले होते की ही वेब सिरीज वगैरे प्रकरण आम्हाला कळत नाही पण हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे असं तुला वाटतं? हा प्रोजेक्ट तुला आवडलाय का?त्यातून तुला काही मिळणार आहे का?या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडून हो असं होतं.कारण मुळात त्यावेळी वेब सिरीज हा प्रकारच नवीन होता.
मग ते म्हणाले की ठीक आहे, तू कर.पण धूम्रपान कसं करायचं हे मी तुला शिकवणार.दुसऱ्या कोणाकडूनही ते शिकायचं नाहीस. हे घरात करायचं जे काही करायचं आहे.तुला दुसरं कोणीही नाही सांगणार .तुझं काम आहे तुझ्या पात्राची गरज आहे.आमच्या सगळ्यांचा तुला पाठिंबा आहे.त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ‘असं ज्ञानदा म्हणाली.