वडील समजावून गेले, पण तिच्या डोक्यात वेगळंच, दोन मुलांना घेतलं अन्…, रात्रीच्या घटनेनं सोलापूर रडलं! | सोलापूर बातम्या


Last Updated:

Solapur News: वैष्णवी आपल्या पोटच्या गोळ्यांना छातीशी कवटाळून झोपायला न जाता थेट घराबाहेर पडली. पण ती चिमुकल्यांसह स्वत:ला कायमचं शांत करायला जात आहे याची कुणाला पुसटशी देखील कल्पना नव्हती.

वडील समजावून गेले, पण तिच्या डोक्यात वेगळंच, दोन मुलांना घेतलं अन्..., रात्रीच्या घटनेनं सोलापूर रडलं!
वडील समजावून गेले, पण तिच्या डोक्यात वेगळंच, दोन मुलांना घेतलं अन्…, रात्रीच्या घटनेनं सोलापूर रडलं!

सोलापूर: घरगुती वाद होत असल्याने वडील लेकीच्या घरी आले. लेकीला आणि जावयाला समजावून सांगितलं आणि परत गेले. ‘आता सगळं ठीक होईल’ अशी वडिलांना आशा होती. मात्र, काही तासांतच फोन आला आणि वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. दोन मुलांना छातीशी कवटाळून लेकीनं विहिरीत उडी घेतली. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील घेरडी येथे ही हृदयद्रावक घटना घडली. त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी आशिष यमगर असं मृत 28 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. यामध्ये साडेतीन महिन्यांची चिमुकली तेजश्री आणि अवघ्या 15 महिन्यांचा मुलगा रुद्राक्ष यांचाही दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी मृत वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं घडलं काय?

सांगोला तालुक्यातील आशिष यमगर हे मुंबईत ट्रेलर ड्रायव्हर म्हणून काम करतात. पत्नी वैष्णवी आणि दोन चिमुकल्यांसह ते मुंबईतच वास्तव्यास होते. कर्नाटकी बेंदूर सणाचा आनंद साजरा करण्यासाठी ते मुंबईहून गावी आले होते. तेव्हा त्यांच्यात कौटुंबिक कारणावर किरकोळ वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुलांना जेवण करत असतानाच उठवलं

​यमगर कुटुंबीय बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास एकत्र बसून जेवण करत होते. 15 महिन्यांचा रुद्राक्ष आणि साडेतीन महिन्यांची तेजश्री वडिलांजवळ खेळत जेवत होते. तेव्हा पत्नी वैष्णवीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. ‘मुलांना झोपवते’, असं सांगत तिने दोन्ही मुलांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि घेऊन गेली.

झोपवायला म्हणून गेली अन् कायमचं शांत केलं

वैष्णवी आपल्या पोटच्या गोळ्यांना छातीशी कवटाळून झोपायला न जाता थेट घराबाहेर पडली. पण ती चिमुकल्यांसह स्वत:ला कायमचं शांत करायला जात आहे. याची कुणाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. आशिष यांनी घरात पाहिलं तर कुणीच दिसत नव्हतं. बराच वेळ झाला तरी वैष्णवी आणि मुले परत देखील आली नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध सुरू केला.

अंधाऱ्या रात्री विहिरीत…

वैष्णवीसह चिमुकल्यांचा शोध सुरू असताना विहिरीच्या काठावर जाऊन पाहिले. तेव्हा वैष्णवीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रात्री 12 च्या सुमारास खोल पाण्यातून दोन निष्पाप चिमुरड्यांचे निष्प्राण देह बाहेर काढण्यात आले. डोळे उघडून जगाकडे पाहायच्या आधीच या दोन कळ्या कोमेजून गेल्या होत्या. हे काळजाचा थरकाप उडवणारे दृश्य पाहून सगळेच रडायला लागले.

क्षणात होत्याचं नव्हतं..

वैष्णवीच्या घरात तक्रार सुरू असल्याचे समजताच वडील बाळू बाबूराव थोरबोले (रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा) हे लेकीकडे आले होते. त्यांनी दोघांची समजूत देखील काढली आणि आता वाद मिटला या भूमिकेतून ते परत गेले होते. मात्र, काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. कौटुंबिक कलह आणि एका क्षणाच्या रागामुळे दोन निष्पाप बालकांसह आईचा बळी गेला. त्यामुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, याप्रकरणी वैष्णवीच्या वडिलांनी सांगोला पोलिसांत खबर दिली आहे. घरगुती तक्रारीवरून मृत्यू झाल्याची नोंद झाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *