५ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरणार? रविवारी रंगणार अर्जेंटिना विरुद्ध स्पेन महामुकाबला | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

फिफा वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना १९ जुलै रोजी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. ५ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरल्याने फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

News18
News18

फिफा वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना 19 जुलै रोजी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात खेळवला जाणार आहे. या ऐतिहासिक महामुकाबल्याची उत्सुकता जगभरात शिगेला पोहोचली असतानाच, सोशल मीडियावर एक ५ वर्षे जुनी पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे फुटबॉलप्रेमींचे डोकं चक्रावून गेलं आहे, रविवारी खरोखरच असे घडणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

५ वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी होणार?

१२ जुलै २०२१ रोजी म्हणजेच तब्बल पाच वर्षांपूर्वी ‘@actuallyimthe’ नावाच्या एका ट्विटर हँडलवरून भविष्यवाणी करण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “२०२६ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिना संघ स्पेनला ३-२ अशा फरकाने हरवून विश्वविजेता बनेल.” आता खरोखरच हे दोन्ही संघ फायनलमध्ये आमनेसामने आल्यामुळे फुटबॉल जगतात खळबळ उडाली आहे. चाहते या अकाउंट चालवणाऱ्याला थेट टाईम ट्रॅव्हलर म्हणत आहेत. या भविष्यवाणीचा अर्धा भाग दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचण्याचा खरा ठरला आहे, आता रविवारी स्कोअरचा दुसरा भाग खरा ठरतो का, हे पाहणे रंजक असेल.

अर्जेंटिनासमोर ६४ वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी

जर या रविवारी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने स्पेनला हरवले, तर ते सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरतील. पुरुष फुटबॉलच्या इतिहासात १९६२ मध्ये ब्राझीलने सलग दोनदा वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला होता, त्यानंतर गेल्या ६४ वर्षांत एकाही संघाला आपले जेतेपद राखता आलेले नाही. अर्जेंटिनाकडे हा इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी आहे.

दोन्ही संघांचा फायनलपर्यंतचा प्रवास

स्पेनचा अभेद्य किल्ला: लुईस डे ला फुएन्ते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेनने पहिल्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सला २-० ने धूळ चारत फायनलचे तिकीट मिळवले. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये स्पेनचा पासिंग गेम आणि भक्कम डिफेन्स अजेय राहिला आहे.

मेस्सीची जादू अन् अर्जेंटिनाचा पलटवार: दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर अर्जेंटिनाने जोरदार पुनरागमन केले. लिओनेल मेस्सीचे दोन जादुई असिस्ट आणि लाउतारो मार्टिनेझच्या विनिंग गोलच्या जोरावर इंग्लंडचा २-१ ने पराभव करून त्यांनी फायनल गाठली.

काँटे की टक्कर

स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात आतापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय सामने झाले असून, दोन्ही देशांनी ६-६ वेळा विजय मिळवला आहे, तर २ सामने ड्रॉ झाले आहेत. या रविवारी फुटबॉलच्या मैदानावर केवळ ट्रॉफीसाठीच नाही, तर ५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ भविष्यवाणीला खरे ठरवण्यासाठी अर्जेंटिना मैदानात उतरेल, तर स्पेन त्यांचा हा विजयरथ रोखण्यासाठी जीवाचे रान करेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *