Last Updated:
अनेक तास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याबाबत अखेर अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. अनेक तास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यान मेट्रोतून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आगामी आठवडाभरात अंतिम परवानगी मिळेल, असा मोठा खुलासा केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. यामुळे आयटीयन्सचा मेट्रो प्रवासाचा मार्ग अखेर मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत सुरू करण्याचा दावा ‘पीएमआरडीए’ने केला होता. परंतु मेट्रो रेल्वे सेफ्टी कमिशनर (CMRS) यांच्याकडून हिरवा कंदील न मिळाल्यामुळे ही सेवा सुरू होऊ शकली नव्हती. ‘सीएमआरएस’ ही संस्था विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत थेट ‘CMRS’ जनक गर्ग यांच्याशी गुरुवारी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या बैठकीनंतर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पहिल्या टप्प्याची पाहणी ५ ते ८ जुलै दरम्यान झाली होती. त्या पाहणीत काही किरकोळ बदल सुचविण्यात आले होते. त्यांची तातडीने पूर्तता करून घेण्यास सांगण्यात आले आहे. हे बदल पूर्ण होताच आठवडाभरात या मार्गावरील वाहतुकीला परवानगी दिली जाईल.”
दुसरीकडे, मेट्रोचे प्रत्यक्ष काम पाहणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’चे (PICTMRL) प्रमुख अमितकुमार सैनी यांच्या कार्यालयाने एक मोठा दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “सीएमआरएस पथकाने पाहणीदरम्यान जे बदल सुचविले होते, ते बदल आम्ही पूर्ण केले आहेत आणि त्याची सविस्तर माहिती जनक गर्ग यांच्याकडे पाठवून दिली आहे.” त्यामुळे आता तांत्रिक आणि सुरक्षेच्या बाजू पूर्ण झाल्या असून केवळ अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे.
पुढील आठवड्यात प्रत्यक्ष धावणार का मेट्रो?
मुरलीधर मोहोळ यांच्या मध्यस्थीनंतर आता दिल्लीतून हालचालींना वेग आला आहे. मेट्रो प्रशासनाने बदल पूर्ण केल्याची माहिती आधीच पाठवली असल्याने, पुढील काही दिवसांतच अंतिम प्रमाणपत्र हाती पडेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील (माण ते बालेवाडी) मेट्रो पुढील आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Pune,Maharashtra
ठरलं तर! अवघे बोटावर मोजण्याइतके दिवस अन् कोंडीतून सुटका; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मुरलीधर मोहोळांचा मोठा खुलासा!
