Last Updated:
Holiday For All Schools: पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी झाल्यानंतर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेने ६ जुलै रोजी शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोणावळा: भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी अत्यंत गंभीर इशारा जारी केला आहे. ५ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत तीव्र स्वरूपाच्या पावसाचा (Extremely Heavy Rainfall) ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून लोणावळा नगरपरिषदेने उद्या सोमवार दिनांक ६ जुलै २०२६ रोजी शहरातील सर्व शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी रविवारी ५ जुलै रोजी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोणावळा शहराच्या हद्दीतील खालील सर्व शाळा उद्या पूर्णपणे बंद राहतील
सर्व माध्यमांच्या अंगणवाड्या
सर्व प्राथमिक शाळा
सर्व माध्यमिक शाळा
सर्व उच्च माध्यमिक शाळा (ज्युनिअर कॉलेज)
लोणावळा आणि मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याचा अंदाज आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, नगरपरिषदेचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी देण्याची विनंती मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असली तरी शाळांमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत किंवा संबंधित कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Management) कामात सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Mumbai,Maharashtra
Jul 05, 2026 11:53 PM IST
सर्व अंगणवाड्या,शाळा, कॉलेजला सुट्टी; शिक्षक अन् कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावली; लोणावळा नगरपरिषदेकडून तातडीचे आदेश
