वैभवला आरामाची गरज नाही..! 15 वर्षीय खेळाडूसाठी कोणी केली बॅटिंग? 2027 वर्ल्डकपबाबत म्हणाले…Image Credit source: BCCI Twitter
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यांचा खेळ संपला असून इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण हा सामना खास ठरला तो 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी.. या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 15 वर्षे आणि 99 दिवस वय असताना त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला पहिला सामना खेळून विक्रम नोंदवला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूंचा सामना केला आणि 14 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने दोन उत्तुंग षटकार मारले. त्याची खेळी पाहून माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी वैभव सूर्यवंशीला जास्तीत जास्त संधी आणि सलग सामने खेळवण्याची मागणी केली आहे. सध्या त्याला आराम देण्याची गरज नाही असंही म्हंटलं आहे.
वैभव सूर्यवंशीला आराम का देऊ नये?
वैभव सुर्यवंशीचा पदार्पणाचा सामना अपेक्षेप्रमाणे झाला नाही. पण भविष्यात काही तरी मोठं करेल याचे संकेत मात्र मिळाले आहे. कारण त्याचा आक्रमक बाणा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही कायम होता. त्यामुळे त्याने जास्तीत जास्त सामने खेळावे ही इच्छा प्रत्येक चाहत्याची आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला जास्तीत जास्त संधी देण्याची शिफारस होत आहे. माजी फिरकीपटू शिवरामकृष्ण यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, वैभवने आता न थांबता खेळायला हवं. त्यामुळे त्याला कमी वयात बरंच काही शिकता येईल.
माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन यांनी वयाच्या 17व्या वर्षी पदार्पण केलं होतं. त्यांनी वैभवबाबत सांगितलं की, ‘त्याला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अपेक्षित संधी दिल्या पाहीजेत आणि कशी कामगिरी करतो हे पाहिलं पाहीजे. युवा खेळाडूला संधी दिल्यानंतर आराम देणं हे काही योग्य ठरणार नाही. त्याला आरामाची गरज नाही. तो पूर्ण वर्षभर खेळू शकतो. दीर्घ काळ फलंदाजी करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि मानसिकतेवर काम करण्यास यामुळे मदत होईल.’
वैभवला 2027 वनडे वर्ल्डकपसाठी तयार करा
शिवरामकृष्णन यांनी वैभवची स्तुती करत कर्णधार, प्रशिक्षक आणि संघातील इतर खेळाडूंनी त्याच्या प्रतिभेला पूर्ण पाठिंबा देण्याची गरज आहे. शिवरामकृष्णन म्हणाले की, ‘वैभव काही सामन्यांमध्ये अपयशी ठरला तरी त्याला संधी दिली पाहीजे.’ इतकंच काय तर त्यांनी त्याला वनडे क्रिकेटमध्येही संधी देण्याची मागणी केली. वैभव सूर्यवंशीला 2027 वनडे वर्ल्डकपसाठी पर्याय म्हणून तयार करता येईल, असंही त्यांनी सांगितलं.