गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडमधील गुंडेनूर नाल्याला पूर, सात गावांचा संपर्क तुटला, पुलाचं बांधकाम अपूर्ण झआल्यामुळे नागरिकांना मनस्ताप


Gadchiroli Flood News : गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामुळे तब्बल सात गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. विशेष म्हणजे या नाल्यावर पुलाचे काम सुरु असले, तरी ते मुदत संपूनही काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. पुरामुळे गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमर्का आणि परिसरातील इतर गावांचा संपर्क तुटला आहे. 

पूर ओसरल्याशिवाय मार्ग खुला होत नसल्याने अनेकांना त्रास

या गावातील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूर ओसरल्याशिवाय मार्ग खुला होत नसल्याने अनेकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे, तर काही जण जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना, पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी पूल पूर्ण झाला असता तर सात गावांतील नागरिकांना या संकटाचा सामना करावा लागला नसता, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सोमवारी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार 

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघर आणि रायगड जिल्ह्यात देखील  शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *