जागतिक पातळीवर पंतप्रधान ‘रिजेक्ट माल’ ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 


Nana Patole  : सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींनी तरुण पिढीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या ट्रेन्डवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील तरुण पिढीचा सातत्यानं होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यांमुळेच तरुणांमध्ये केंद्र सरकारविरोधात तीव्र असंतोष असल्याचं पटोले म्हणाले. नुकतेच सर्वोच्च न्यायालयामध्ये एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तरुण पिढीचा उल्लेख कॉकरोच असा केल्याचे समोर आले आहे. देशाच्या तरुण पिढीला अशा पद्धतीची उपमा दिली जाणे आणि त्यांची सामाजिक व्यवस्थेमध्ये अशी संभावना होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे पटोले म्हणाले.

तरुणांचा हा पदोपदी होणारा अपमान आता त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलाय

देशातील सुशिक्षित तरुण-तरुणी पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या घेऊनही बेरोजगार बसले आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून कधी त्यांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जातो, तर कधी इतर गोष्टी सांगितल्या जातात. तरुणांचा हा पदोपदी होणारा अपमान आता त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप सरकारवर केला आहे 

पंतप्रधानांमुळं जागतिक पातळीवर देशाची मान शर्मेनं खाली गेल्याची टीका पटोले यांनी केली. जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल असल्याचे नाना पटोले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून आणि त्या दरम्यान घडणाऱ्या घडामोडींवरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींचे निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली आहे. पंतप्रधानांच्या अशा वागण्यामुळं जागतिक पातळीवर भारताची मान शर्मेनं खाली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

पंतप्रधानांचे वर्तन हास्यास्पद 

देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशाचा फायदा होतो, अनेक महत्त्वपूर्ण करार केले जातात. मात्र, आता फडणवीसांनीच यावर उत्तर दिलं पाहिजे की, इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणं कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यावर ‘रिजेक्ट माल’ म्हणून टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला. जे राहुल गांधींना रिजेक्ट माल म्हणत होते, त्यांनी आता पाहावे की, त्यांचे स्वतःचे पंतप्रधान आज जागतिक पातळीवर ‘रिजेक्ट माल’ ठरत आहेत असे पटोले म्हणाले. पंतप्रधानांच्या अशा कृतींमुळे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडत असून, या दौऱ्यांमधून देशाच्या पदरात काय पडले, असा सवालही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *