जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक, गडचिरोली प्रशासनात खळबळ


Gadchiroli Crime News :  गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळं गडचिरोली प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र

दरम्यान, गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील कथित चार कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट जिल्हा परिषदेच्या नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या बनावट नियुक्तीपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, कार्यालयीन नमुना आणि नियुक्तीच्या अटी-शर्ती हुबेहूब तयार करण्यात आला आहे. एवढंच नाही, तर संबंधित उमेदवाराला ठरावीक तारखेला रुजू होण्याचे आदेशही या पत्रात देण्यात आले आहे. 

थेट बनावट नियुक्तीपत्र समोर आल्याने गडचिरोलीत खळबळ

दरम्यान, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी हे नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करत संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शाळांमधील परिचर पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आता थेट बनावट नियुक्तीपत्र समोर आल्याने गडचिरोलीत सरकारी कागदपत्रांची बनावटगिरी करणारे रॅकेट सक्रिय असल्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *