पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, सर्व शाळांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती


पुणे :  मुंबईस ठाणे, पालघर, कल्य़ाण डोंबिवली पुणे तसेच कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आले आहे. या पावसामुळं  मुंबईसह ठाण्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर आता पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  हवामान विभागाने उद्या पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

 नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे

 नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन  डुडी  यांनी केले आहे.

 मुंबई विद्यापीठाच्या 6 जुलैला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 6 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. सदर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. विद्यार्थी, महाविद्यालये आणि संबंधित सर्वांनी याची नोंद घ्यावी.

सोमवारी मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार 

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवार म्हणजे उद्या दिनांक 6 जुलै 2026  रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये देखील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला उद्या सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा ( Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना उद्या, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, शासकीय व खासगी कार्यालये नियमितपणे सुरू राहतील.  आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालघर आणि रायगड जिल्ह्यात देखील  शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै) अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी रायगड, नाशिक, पुण्यासह सातारा घाटमाथा परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे, तर मुंबई आणि ठाण्यासह इतर किनारी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे सतर्क मोडवर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सुट्टीच्या कालावधीत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत किंवा कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या (Disaster Management) कामात मदत करावी लागणार आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *