आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची तरी लाज वाटू द्या, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, म्हणाले सरकारनं 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात केला


Rohit Pawar : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आषाढीच्या पूजेला येताय आणि या पवित्र भूमीत दिलेला शब्द पाळत नाहीत. जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज वाटू द्या, अशा शब्दात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली. पंढरपूरला येण्यापूर्वी एकदा नाही तर दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी विचार केला पाहिजे असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

 44 लाख शेतकरी आणि मजुरांचा विश्वासघात 

काही दिवसापूर्वी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन पंढरपूर येथे केले होते. यावेळी राज्य सरकारने गिरीश महाजन यांना पाठवून अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 22 तारखेला अधिवेशन सुरू होऊनही अद्याप बैठक न झाल्याने आज रोहित पवार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या एल्गार यात्रेला सुरुवात केली. हा माझा नाही तर 44 लाख शेतकरी आणि मजुरांचा विश्वासघात या फडणवीस सरकारने केल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. मी 22 तारखेला अधिवेशनासाठी गेलो. मात्र माझे तिथे मनच रमले नाही. या पवित्र भूमी दिलेले आश्वासन देखील हे सरकार पाळत नसेल तर अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांवर काय विश्वास ठेवायचा असा विचार करून आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात लोकांमध्ये जाऊन संभाजीनगर येथे सरकारने पाहिले नसेल असे आंदोलन करणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

हे फसवे सरकार असल्याची टीका

काही महिन्यांपूर्वी या भागात अतिवृष्टी झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या. या नुकसानीसाठी सरकारनं 35000 कोटी रुपयांची घोषणा केली होती. मात्र, मिळाली किती तर फक्त 12 हजार कोटी रुपये. पिक विम्याचा तर एक रुपया सुद्धा मिळाला नाही. अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी 20000 कोटीची तरतूद केली. मात्र यातील 5000 कोटी तर 2017 मधले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना घोषणा केली 35000 कोटीची आणि मिळणार केवळ 14 ते 15000 कोटी असे हे फसवे सरकार असल्याचा घणाघातही रोहित पवार यांनी केला आहे. 

बऱ्याच नेत्यांनी 85 कोटी रुपये घेऊन भूमिका बदलली

आज बऱ्याच नेत्यांनी 85 कोटी रुपये घेऊन भूमिका बदलली विचार बदलले आणि पार्टी बदलली. अशा शब्दात रोहित पवार यांनी पक्ष बदलणाऱ्यांवर सडकून टीका केली. मात्र या वेळेला त्यांनी 85 कोटी रुपयांचा उल्लेख नेमका कोणत्या संदर्भाने केला हे न सांगता माझ्यावर सोन्याचा चमचा घेऊन जन्मल्याची टीका करणारे आता या पैशातून स्वतःसाठी आणि आपल्या नातवांसाठी सोन्याचे चमचे खरेदी करणार आहेत का? असा टोला त्यांनी लगावला. सहा खासदार आपल्या सोबत लढत होते ते आता गायब झाले आहेत असा टोलाही त्यांनी लगावताना आता शेतकऱ्यांना स्वतःचा लढा स्वतःच लढला पाहिजे असे आवाहन केले. 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *