मुंबई : महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मविआच्या बैठकीमध्ये उपस्थित केला. यापुढे तीनही पक्षांना एकत्र राहूनच काम करावं लागेल, एकत्रित मुद्दे मांडावे लागतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये 60 पैकी 37 आमदार उपस्थित होते. तर जयंत पाटील यांच्यासह 23 आमदार अनुपस्थित होते. शरद पवार आणि जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे या बैठकीला येऊ शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्या दोन दिवसात विरोधकांना म्हणावं तितक्या ताकदीने प्रश्न उपस्थित करता आले नसल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला 23 आमदार उपस्थित राहू शकले नाहीत.
Uddhav Thackeray MVA Meeting : उद्धव ठाकरेंची खंत
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले. या खासदारांच्या फुटीबाबत मात्र या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. मात्र महाविकास आघाडीच्या एकीबाबत मात्र उद्धव ठाकरेंनी खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडी म्हणून आपण सभागृहात एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केला. येणाऱ्या काळात विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा महाविकास आघाडी म्हणून, विरोधक म्हणून आपण एकी दाखवली पाहिजे. सोबतच राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलन सुद्धा एकत्रित करायला हवेत, आपली एकी राज्यभर दिसायला हवी, असं मत उद्धव ठाकरेंसह इतर नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.
Mahavikas Aghadi Meeting : शरद पवार, जयंत पाटील अनुपस्थित
या बैठकीला महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, ज्योती गायकवाड, भास्कर जाधव हे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील हे मात्र वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती आहे.
Shivsena Operation Tiger : पावसाळी अधिवेशनापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’वर निर्णय
ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंड करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. पावसाळी अधिवेशापूर्वी ऑपरेशन टायगरवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला फैसला करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहा बंडखोर खासदार हे मशाल चिन्हावर निवडून आलेत, हे खासदार ठाकरे पक्षाचे असल्याचं मत खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी ओम बिर्लांसोबत झालेल्या भेटीत मांडलं.
दरम्यान, कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय करु असं आश्वासन ओम बिर्लांनी दिलं आहे. त्याआधी ठाकरेंच्या सहा खासदारांनी अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील होण्याचं पत्र दिलं आहे. तसेच डीमके आणि टीएमसीच्या बंडखोर खासदारांना इंडिया आघाडीपासून वेगळे बसवण्याच्या प्रश्नावरही निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा:
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!