Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले


India A vs Afghanistan A 5th Match Tri Nation A Series : भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात सुरू असलेल्या तिंरगा मालिकेतील पाचव्या सामन्यात एक मोठा वाद निर्माण झाला. भारतीय डावाच्या अवघ्या दुसऱ्याच षटकात वैभव सूर्यवंशीच्या झेलावरून मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. थर्ड अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मैदानातच अंपायरांशी जोरदार चर्चा केली.

दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? (Vaibhav Sooryavanshi Catch Controversial)

नाणेफेक गमावल्यानंतर भारत अ संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. डावाच्या 1.3 षटकात शम्स उर रहमानच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशीने पॉइंटच्या दिशेने हवेत फटका मारला. चेंडू हवेत उंच गेल्यानंतर तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या फरीदूनने डाव्या बाजूला अप्रतिम झेप घेत एका हाताने झेल पकडल्याचा दावा केला. मैदानावरील खेळाडू आणि प्रेक्षकांना हा झेल स्वच्छ वाटत होता. मात्र, मैदानी अंपायरांनी खात्री करण्यासाठी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. रिप्लेमध्ये एका अँगलवर फरीदून जमिनीवर पडताना चेंडूचा काही भाग गवताला स्पर्श करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर थर्ड अंपायरने वैभवला नाबाद (Not Out) घोषित केले. 

अफगाणिस्तानचा संताप (Afghanistan players Heated argument umpires)

हा निर्णय जाहीर होताच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते हा झेल घेतला होता आणि वैभव बाद होता. निर्णयाविरोधात काही खेळाडूंनी अंपायरांशी मैदानातच चर्चा केली. काही काळ सामन्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वैभव सूर्यवंशीच्या भोवती निर्माण झालेला हा वाद नवीन नाही. याच तिंरगा मालिकेत श्रीलंका अ विरुद्धच्या मागील सामन्यातही वैभव चर्चेचा विषय ठरला होता. त्या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंशी त्याची शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्या घटनेची मोठी चर्चा रंगली होती. आता सलग दुसऱ्या सामन्यात वैभवशी संबंधित पुन्हा मैदानावर वाद निर्माण झाल्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

सोशल मीडियावरही जोरदार चर्चा

या वादग्रस्त झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. काही चाहते थर्ड अंपायरचा निर्णय योग्य असल्याचे सांगत आहेत, तर अनेक जण फरीदूनचा झेल वैध असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे या एका निर्णयावरून क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा –

Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : मालिका जिंकणार की अफगाणिस्तान करणार पलटवार? लखनऊत रंगणार हायव्होल्टेज थरार!





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *