UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती


नवी दिल्ली: प्रादेशिक हवाई संपर्क योजना ‘उडान’ (UDAN) च्या पुढील टप्प्याची प्रभावी, वेळेत आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), DGCA, विमान कंपन्या, विमानतळ संचालक आणि इतर सर्व संबंधित भागधारकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. ‘उडान’च्या पुढील टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 2026-27 ते 2035-36 या कालावधीत सुमारे 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू, नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार, मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, विविध राज्य सरकारांचे प्रतिनिधी, विमान कंपन्या, विमानतळ संचालक तसेच नागरी उड्डयन क्षेत्रातील विविध भागधारक उपस्थित होते. ‘उडान’च्या पुढील टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय आणि कृती आराखड्याबाबत या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उडाणच्या पुढच्या टप्प्यात 28840 कोटींची गुंतवणूक

मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून 2016 मध्ये सुरू करण्यात आलेली ‘उडान’ योजना ही देशातील सामान्य नागरिकांपर्यंत हवाई प्रवास पोहोचविणारी परिवर्तनकारी योजना ठरली आहे. “हवाई चप्पल घालणारा नागरिकही हवाई प्रवास करू शकला पाहिजे” हा पंतप्रधानांचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचे काम या योजनेने केले आहे. आज देशातील लहान शहरे, दुर्गम भाग, सीमावर्ती प्रदेश आणि आकांक्षी जिल्हे हवाई संपर्काच्या मुख्य प्रवाहात आले असून पर्यटन, व्यापार, आरोग्यसेवा, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे.

मोहोळ यांनी सांगितले की, आतापर्यंत ‘उडान’ अंतर्गत देशभरात 670 हून अधिक प्रादेशिक मार्ग कार्यान्वित करण्यात आले असून 95 विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एअरोड्रोम राष्ट्रीय हवाई नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या मार्गांवर 3.40 लाखांहून अधिक उड्डाणे संचालित झाली असून 1.70 कोटींहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या मार्गांची आर्थिक व्यवहार्यता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 4500 कोटी रुपयांहून अधिक व्हायबिलिटी गॅप फंडिंग उपलब्ध करून दिली आहे. तसेच UDAN Yatri Cafe सारख्या उपक्रमांमुळे हवाई प्रवास अधिक सुलभ आणि प्रवासी-केंद्रित बनविण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 2026-27 ते 2035-36 या कालावधीत सुमारे 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या टप्प्यात 120 नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट असून पुढील दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय 100 नवीन विमानतळांचा विकास, 441 एअरोड्रोमना कार्यान्वयनासाठी सहाय्य, दुर्गम भागात 200 आधुनिक हेलिपॅडची उभारणी आणि प्रादेशिक मार्गांसाठी मोठ्या प्रमाणावर व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करण्यात आली आहे.

मोहोळ यांनी सांगितले की, गेल्या दशकात भारताच्या नागरी उड्डयन क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती केली आहे. 2014 मध्ये देशात कार्यरत असलेल्या 74 विमानतळांची संख्या आज 160 हून अधिक झाली आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ बनला असून प्रवासी संख्या, विमान ताफा, हरित विमानतळ, Digi Yatra, MRO क्षेत्रातील सुधारणा आणि डिजिटल उपक्रमांमुळे भारतीय नागरी उड्डयन क्षेत्र जागतिक स्तरावर वेगाने पुढे जात आहे.

या कार्यशाळेत राज्य सरकारे, विमान कंपन्या, विमानतळ प्राधिकरण, DGCA आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी आपापले अनुभव, अंमलबजावणीतील आव्हाने आणि पुढील कृती आराखड्याबाबत चर्चा केली. नव्या मार्गांवर नियमित सेवा सुरू करणे, विमानतळ विकासाची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

“उडानचा पुढील टप्पा हा केवळ हवाई संपर्क विस्तारण्याचा कार्यक्रम नाही, तर विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सर्व संबंधित भागधारकांच्या सक्रिय सहभागातून या योजनेचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा मला विश्वास आहे,” असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *