बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही आपल्या सौंदर्य, फिटनेस आणि चमकदार त्वचेमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 51 व्या वर्षीही ती आपल्या वयापेक्षा खूपच तरुण दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे.
सोनालीने सांगितले की, ती कोणताही कठोर डाएट प्लॅन पाळत नाही. त्याऐवजी ती इंटरमिटंट फास्टिंगचा अवलंब करते. ती दररोज सुमारे 18 ते 20 तास उपवास करते आणि दिवसातील पहिले जेवण अतिशय विचारपूर्वक निवडते. फिट राहण्यासाठी स्वतःवर अनावश्यक बंधने घालण्याची गरज नसून, चांगल्या सवयी जीवनशैलीचा भाग बनवणे महत्त्वाचे असल्याचे ती सांगते.
सोनाली स्वतःला फारशी 'फूडी' मानत नसली तरी आवडीचे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाते. मात्र तिने साखर पूर्णपणे आहारातून काढून टाकली आहे. त्याऐवजी ती नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करते. तिच्या मते, दीर्घकाळ उपवास आणि साखर टाळल्यामुळे तिला अधिक उत्साही आणि निरोगी वाटते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रिफाइंड साखरेचे जास्त सेवन केल्याने शरीरात ग्लायकेशन ही प्रक्रिया वाढते. यामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन हे महत्त्वाचे प्रथिने कमकुवत होतात. परिणामी त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात, त्वचा सैल होते आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात.
याशिवाय, पांढऱ्या साखरेत कोणतेही पोषक घटक किंवा तंतुमय पदार्थ नसल्याने ती केवळ रिकाम्या कॅलरी पुरवते. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याचा धोका निर्माण होतो. नियमितपणे जास्त साखर खाल्ल्यास विविध आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे त्वचेचे आरोग्यही बिघडते आणि व्यक्ती वयापेक्षा अधिक वृद्ध दिसू शकतो.




