आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा


Sonakshi Sinha on Sonam Wangchuk strike :  NEET परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. गेल्या 19 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरु आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दरम्यान, या उपोषणाच्या मुद्यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे. 

नेमकं काय म्हणाली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा?

मी यापूर्वी कधीही कोणतेही विधान केलेले नाही, पण आता मी गप्प बसू शकत नाही. सोनम यांच्यासारखी एक प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी 18 दिवसांपासून उपोषणावर बसली आहे आणि तरीही सगळे गप्प आहेत. आता मी आवाज उठवणार आहे. आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आपल्यालाही आपले मत मांडण्याचा अधिकार असायला हवा. मला भीती वाटत नाही, जे होईल ते पाहू अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने दिली आहे. सरकारने सोनम यांच्याशी चर्चा केली पाहिजे असेही सोनाक्षी सिन्हा म्हणाली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचेही ती म्हणाली. 

18 दिवसांत तब्बल 9 किलो वजन घटले

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनात सहभागी होऊन सोनम वांगचुक 20 जूनपासून जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. सलग 19 दिवस अन्नत्याग केल्यामुळे वांगचुक यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. अवघ्या 18 दिवसांत त्यांचे वजन 8.9 किलोने घटून आता 57.15 किलोवर आले आहे. डॉक्टरांच्या मते, ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी सुरू असलेल्या उपोषणाचा त्यांच्या अंतर्गत अवयवांवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही चिंता

वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकारकडून केवळ मौन मिळत असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारवर तोफ डागत, “सरकार जबाबदारी टाळत असून त्यांची वृत्ती क्रूर आहे,” अशी टीका केली. दुसरीकडे, या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील ‘हिंदू फॉर ह्युमन राइट्स’ या संघटनेने वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आवाहन करत, आंदोलकांशी त्वरित संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांना ठोस प्रतिसाद द्यावा आणि परीक्षा पद्धतीत उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, अशी मागणी केली आहे.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *