हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन याचा ओपन हायमर साल २०२० साली आला होता. अणुबॉम्बचा जनकावर हा चित्रपट बेतला होता. क्रिस्टोफर नोलन या नावाचं गारुड सिने चाहत्यांवर आहे की हा दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या मागे उभा राहिला तर पडद्यावर काही तरी इतिहास रचला जाणार आहे याची खात्री प्रेक्षकांना असते. इंटरस्टेलर ( २०१४ ), डंकर्क ( २०१७ ) आणि त्यानंतर ओपनहायमर ( २०२३ ) आणि आता दि ओडीसी (The Odyssey) पडद्यावर काही रोमांचक आणि साहसी पाहायला मिळणार आहे याची खात्री प्रेक्षकांना असते. तीन तासांचा दि ओडिसी सिनेमा स्क्रीनवर जेव्हा सुरु होतो. तेव्हा तुम्ही आजूबाजूचे जग विसरुन भान हरपून वेगळ्याच जगात जाता. मॅट डेमन, टॉम हॉलंड आणि ऐनी हॅथवे अशा दिग्गज कलाकारांचा भरणा असलेला हा चित्रपट सिनेमा कलेचा का जन्म झाला असावा याचे उत्तर आहे. एक्शन आणि इतिहासातील गाथा पडद्यावर पाहाताना तुम्ही त्या जगातले होऊन जाता..असा हा सिनेमा बनला आहे.
या चित्रपटाच्या केंद्रस्थानी हॉलिवूड स्टार मॅट डेमन आहे. ज्याने ओडिसियस हे पात्र त्याच्या संपूर्ण अभिनय कारकीर्दीत जीव ओतून अमर केले आहे. नोलन याचा ओडिसियस हा काही पारंपारिक सर्वच बाबती परफेक्ट दिसणारा नायक नाहीत. त्याने चुका करणारा आणि त्यातून शिकणारा हाडामासाचा योद्धा चितारला आहे. हे कॅरेक्टर त्याने अक्षरश: जगले आहे. त्याचे हत्यार तलवार नसून त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानण्याची जिगर आहे. ट्रोझन हॉर्सपासून बचाव करीत पळण्याची कृती किंवा जादूगर सर्सी हिच्या सापळ्यातून आपल्या सैन्याची सुखरुप सुटका करणे, आपल्या घरी जायची त्याला लागलेली ओढ, दु:ख आणि वेदना, पश्चाताप अशा भावना त्याने पडद्यावर अशा साकारल्या आहेत की प्रेक्षक यात गुंतून पडतो.
स्पायडर साकारणारा अभिनेता
स्पायडर मॅनचे पात्र साकारणारा अभिनेता टॉम हॉलंड देखील या सिनेमात वेगळ्या आणि संवेदनशील भूमिकेत आहे. त्याने सुपर हिरोची इमेज सोडून टेलिमॅकस याचे भावनिक पात्र साकारले आहे. वडिलांच्या छत्राशिवाय वाढलेले एका कमजोर मुलाचे पात्र त्याने साकारले आहे. ऐनी हॅथवे हीने युद्धात अनेक वर्षांपासून बेपत्ता झालेल्या पतीची अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या आणि आपल्या राज्याचे संरक्षण करणारी राणी हे कॅरेक्टर तिने उत्तम वटवले आहे. जेंडाया या अभिनेत्रीला कमी रोल मिळाला असला तरी तिने पडद्यावरील सीनमध्ये आपली छाप सोडली आहे. हा चित्रपट मल्टी स्टारर असला तरी कोणतेही पात्र गैरलागू वाटत नाही. प्रत्येकाचा रोल महत्वाचा वाटतो.
‘दि ओडिसी’ केवळ देवता, राक्षस, चमत्कार आणि राजांची काल्पनिक कहानी नाही. तर युद्धाच्या भयानक मानवीय किंमतीला संपूर्ण संवेदनशीलपणे पडद्यावर साकारणारी गोष्ट आहे. दिग्दर्शन ख्रिस्टोफर नोलन यांनी ग्रीक पौराणिक मान्यता आणि ज्यूसच्या दैवीय नियमांना मानवी भावनांशी जोडून एक मार्मिक सैनिकांची गाथा पडद्यावर चितारली आहे. युद्धात आपली जिवलग माणसे गमावण्याचे दु:ख, घराची उबदार ओढ आणि युद्धाची किंमत ही सर्व मुल्ये अनेकदा रुपेरी पडद्यावर आलेली असली तर ती ख्रिस्तोफर नोलन यांच्या नजरेतून पाहाणे हे खूपच महत्वाचे असल्याचे क्षणोक्षणी आपल्यास जाणवते.
श्वास रोखणारा क्लायमॅक्स
या चित्रपटाचा अर्क म्हणजे याचा शेवटच्या अर्ध्या तासांचा क्लायमॅक्स तुमच्या मनावर आणि शरीरावर काटा उभा करतो. क्लायमॅक्स वेगवान घडामोडी, एक्शन, इमोशन आणि वर्षांपासून मनात कोंडलेल्या वाफेला बाहेर पडण्याची मिळालेली वाट याचा बेजोड नमुना आहे. जो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तुम्हाला डोळ्यांच्या पापण्या मिटू नयेत असे वाटावे इतक्या खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या घडामोडी या क्लायमॅक्समध्ये आहेत आणि श्वास रोखून तुम्हाला त्या पाहाव्या लागतील असा मेलोड्राया यात आहे.
IMAX कॅमेऱ्यांनी शुट केलेला हा सिनेमा आयमॅक्सच्या भव्य पडद्यासाठीच तयार झालेला आहे. या भव्य आयमॅक्स कॅमेऱ्यात एकावेळी तीन मिनिटांचा सीन चित्रीत करता येतो. चित्रपटातील दीर्घ आणि विना कट असणारी दृश्य पाहून याची जाणीव होते की यातील पडद्या मागील कलाकार आणि क्रुने किती तगडी रिहर्सल आणि मेहनत केली असेल. बॅकग्राऊंड म्युझिक या चित्रपटातील स्वतंत्र कॅरेक्टर आहे. ही महागाथा शुक्रवार पासून पडद्यावर कोणता इतिहास रचते ते उद्यापासून कळणार आहे.