Sanjay Pawar: “पैशाच्या आणि दबावाच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह चोरणारे स्वतःच्या हिंमतीवर कधीच मैदानात उतरू शकत नाहीत,” अशा शब्दात कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बंडखोर खासदारांवर तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे हे सर्वांच्या छातीवर पाय ठेवून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दबावाचे गलिच्छ राजकारण
संजय पवार म्हणाले, सध्या देशातील आणि राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या थराला गेले असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. ते म्हणाले, “आज देशात फोडाफोडीचे, पैशाचे आणि दबावाचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. ज्या भारताला जगातील एक नंबरचा लोकशाही देश म्हटले जाते, तिथे केवळ सत्तेसाठी लोकशाहीची मूल्ये संपवली जात आहेत. जर विरोधकांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरावे. आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी मशागत करून पीक तयार करायचे, शिवसैनिकांनी राबायचे आणि तुम्ही सत्तेच्या व धमकीच्या जीवावर आयते पीक कापून नेणार? ही कुठली राजकारणाची पद्धत?”
मुख्यमंत्रीपदाच्या ईर्षेपोटी दिल्लीत वाऱ्या
सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमागे मुख्यमंत्री पदाची ईर्ष्या कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अनेक लोक सध्या दिल्लीला चकरा मारत आहेत, काही जण तिथून निराश होऊन परत येत आहेत. देवेंद्र फडणवीस हे सहजासहजी बाजूला होणार आहेत का? केवळ कुणालातरी शह देण्यासाठी आणि दिल्लीश्वरांसमोर आपली ताकद मोठी दाखवून मुख्यमंत्री पद लाटण्यासाठी हा सर्व खेळ सुरू आहे. पण हे अत्यंत घातक असून देश चुकीच्या दिशेने चालला आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
जनता धडा शिकवेल
अडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडणाऱ्यांवर संताप व्यक्त करताना संजय पवार म्हणाले, “कुटुंब व्यवस्था अडचणीत आल्यानंतर कुटुंबप्रमुखाला सोडून जाणे या लोकांना शोभते का? पक्षाने तुम्हाला पदे दिली, चिन्ह दिले, निवडणुकीत लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या आणि आज स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही पाठ फिरवत आहात. जे लोक निघून गेले आहेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच धडा शिकवेल.”
फिनिक्स पक्षासारखी उभारी घेणार
राज्यातील वाढत्या राजकीय अनागोंदीवर इशारा देताना ते म्हणाले की, “आज आपण श्रीलंकेमध्ये आणि नेपाळमध्ये जी परिस्थिती पाहत आहोत, लोक जसे तिथे सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, तशीच परिस्थिती काही वर्षांत हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात होईल. जनता या राजकारणाला कंटाळली असून ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.” शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर बोलताना पवार यांनी मान्य केले की प्रत्येक क्षेत्रात वाईट दिवस येत असतात. “राजकारण, व्यवसाय किंवा खेळ असो, ‘बॅड पॅच’ सगळ्यांनाच येतो. आज आमचे वाईट दिवस आहेत, पण उद्या ते नक्की बदलतील. याचा अर्थ आम्ही संपलो असा नाही. आम्ही फिनिक्स पक्षासारखे राखेतून पुन्हा उभारी घेऊ आणि ‘मातोश्री’च महाराष्ट्रात एक नंबरवर आहे, हे आमच्यातील शिवसैनिक पुन्हा दाखवून देतील.”
छातीवर पाय ठेवून उभे राहतील
शेवटी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवत संजय पवार म्हणाले, “उद्धव साहेब हे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. ते संकटांना घाबरून खचून जाणारे पुत्र नाहीत, तर संकटांवर उरून उरणारे आहेत. लाखो-कोटी शिवसैनिकांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. ते विरोधकांच्या छातीवर पाय ठेवून पुन्हा ताकदीने उभे राहतील.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद