Last Updated:
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा राशिद खानच्या सापळ्यामध्ये अलगद अडकला. राशिदच्या गुगलीवर रोहित शर्मा बोल्ड झाला, त्यानंतर स्टेडियममध्ये एकच सन्नाटा पसरला.
लखनऊ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाला सुरूवातीलाच धक्का बसला. वनडे टीममध्ये कमबॅक करणारा यशस्वी जयस्वाल 9 बॉलमध्ये 4 रन करून आऊट झाला. यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी टीम इंडियाला सावरलं, पण राशिद खानच्या खतरनाक गुगलीवर रोहित शर्मा बोल्ड झाला.
9 रनवरच पहिली विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 87 रनची पार्टनरशीप झाली, पण ही पार्टनरशीप राशिद खानने तोडली. रोहितची विकेट घेण्यासाठी राशिद खानने सापळा रचला आणि या सापळ्यात रोहित अलगद अडकला.
12व्या ओव्हरमध्ये राशिद खानने रोहित शर्माला ऑफ स्टंपच्या लाईनवर 3 लेग स्पिन टाकले ज्यावर रोहितने डिफेन्सिव शॉट खेळला, यानंतर 14व्या ओव्हरचा पहिलाच बॉल राशिदने त्याच लाईनवर टाकला, पण हा बॉल लेग स्पिन नाही तर गुगली होता, जो रोहितला समजलाच नाही. राशिद खानचा हा बॉल थेट स्टंपवर जाऊन आदळला, ज्यामुळे रोहितला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
रोहितचा राशिदसमोर संघर्ष
39 बॉलमध्ये 48 रन करून रोहित आऊट झाला. राशिद खानने टाकलेला हा बॉल पाहून रोहितलाही विश्वास बसला नाही. रोहित शर्माला त्याच्या करिअरमध्ये राशिद खानविरुद्ध संघर्ष करावा लागला आहे. रोहितने राशिदविरुद्ध 11 इनिंगच्या 75 बॉलमध्ये 17 च्या सरासरीने 102 रन केले, ज्यात रोहित 6 वेळा आऊट झाला आहे.
रोहितने इतिहास घडवला
आऊट होण्याआधी रोहित शर्माने क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर केला. रोहितने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 14 हजार रन पूर्ण केल्या आहेत. या सामन्याआधी रोहितला हा रेकॉर्ड करण्यासाठी फक्त 10 रनची गरज होती. रोहितच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 11,640 रन आल्या आहेत.
357 सामन्यांमध्ये 37 शतकं
रोहित शर्माने त्याच्या करिअरमध्ये 357 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 345 इनिंगमध्ये 46 पेक्षा जास्तच्या सरासरीने 14,038 रन केल्या आहेत, यात त्याने 37 शतकं आणि 74 अर्धशतकं ठोकली आहेत.
टीम इंडियामध्ये 3 बदल
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात 3 बदल केले गेले आहेत. नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याऐवजी यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव आणि प्रिन्स यादव यांना संधी देण्यात आली आहे. प्रिन्स यादव या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.
Mumbai,Maharashtra
