Sanjay Raut : गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत तोपर्यंत चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील; ऑपरेशन टायगरवरुन संजय राऊतांची बोचरी टीका


नवी दिल्ली : जे खासदार आम्हाला सोडून जात आहेत त्यामागे फक्त पैसा हेच कारण आहे, यांना काही नीतिमत्तेची चाड उरली नाही अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, मात्र त्या आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. ज्यांची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नव्हती त्यांना ठाकरेंनी खासदार केलं, असाही टोला राऊतांनी लगावला. गुजरातचे दोन व्यापारी जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत या चोऱ्या-माऱ्या, लबाड्या होतच राहतील अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं असून त्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार त्यांच्यासोबत आले आहेत. त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दीना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. ठाकरेंना सोडून जाणाऱ्या खासदारांवर संजय राऊतांनी टीका केली. 

राजीनामा देऊन पक्ष बदला

संजय राऊत म्हणाले की, “हा काळ म्हटलं तर कठीण आहे आणि म्हटलं तर आव्हानात्मक आहे. प्रत्येक पक्षाच्या वाटचालीत असा एखादा प्रसंग, वेळ येऊ शकते. पक्ष ज्यावेळी सत्तेत असतो त्यावेळी तुम्हाला उपभोग घेता येतो. पण पक्ष ज्यावेळी सत्तेत नसतो त्यावेळी आपल्याला संघर्ष करावा लागेल हे मनाशी ठाम केलं पाहिजे. तुम्ही जर ठरवलं असेल सोडून जायचं तर त्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा. ज्या पक्षाने तुम्हाला खासदार केलं, खासदारकी लढवण्यासाठी पैसे दिले आहेत, त्या पक्षाचा आधी राजीनामा द्यावा आणि कुठे जायचं ते जावं.”

उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत? 

उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत असा आरोप केला जातोय. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे जर वेळ देत नसते तर तुम्ही निवडून आले असता का? तुम्ही खासदार आहात, तुमच्या मतदारसंघात कामं करा. त्यासाठी उद्धव ठाकरे कशाला पाहिजेत? ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही अशा लोकांना पक्षाने खासदार केलं.”

पक्ष फुटत नाही, काही आमदार-खासदार हे लोभापोटी फुटतात. आमचं चिन्ह गेला, पक्ष गेला… परंतु नव्या चिन्हावर नऊ खासदार निवडून आणले, असं संजय राऊत म्हणाले. 

दोन वेळा खासदार का फुटले?

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदर दुसऱ्यांदा फुटले आहेत. त्यासंबंधी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “हे खासदार फुटले त्यामागे पैसे हेच मोठं कारण आहे. तुम्ही सांगा, का सोडून जात आहात? जे पाच ते सहा लोक फुटून जात आहेत त्यांच्यामध्येच मंत्री कोण व्हायचं यावरून वाद सुरू आहे. मला तुरुंगात टाकलं, राहतं घर जप्त केलं. आमच्या कुटुंबाला अनेक वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलं. पण आम्ही लढत राहिलो. आम्ही आमच्या छातीवर गोळ्या घेऊ, लढत राहू.”

उद्या आमच्या खासदारांची एक बैठक आहे. त्यासंबंधी आमचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी व्हिप काढला आहे. त्यावेळी समजेल आमच्यासोबत कुणी आहेत ते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. या लोकांनी त्यांच्या जहागीरदाऱ्या वाचवण्यासाठी पक्ष बदलला. पण काहीतरी नितिमत्तेची चाड असते. पण आता जे लोक पक्ष सोडत आहेत, त्यांच्यामागे असं काही मोठं कारण आहे का? अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.

जो विषय देशाच्या संविधानाच्या अस्तित्वाचा आहे, त्यावर न्यायालय सुनावणी करत नाही. आतापर्यंत पाच सरन्यायाधीश बदलले, सहावाही बदलेल. न्यायालयावर कुणाचा दबाव आहे हे लोकांना माहिती आहे, असं राऊत म्हणाले. उद्या जर आमच्या बाजूने न्याय मिळाला तर एकनाथ शिंदेंनाही त्यांच्या आमदार-खासदारांसाठी एक नवा पक्ष शोधावा लागेल, असा टोला राऊतांनी लगावला. 

जोपर्यंत गुजरातचे दोन व्यापारी सत्तेत आहेत तोपर्यंत या चोऱ्या-माऱ्या, लबाड्या कराव्याच लागतील. या दिल्लीतल्या व्यापाऱ्यांना बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा पहिल्यापासून द्वेष आहे, त्यातून या गोष्टी सुरू आहेत. यांना पैशाचा आणि सत्तेचा जो माज आहे तो पाहता एक दिवस लोक यांना रस्त्यावर अंडी फेकून मारतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. 

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दीना पाटील.

ही बातमी वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *