महागाई ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ती काही केल्या कमी होत नाही. दरदिवशी काहींना काही गोष्टी महागलेल्या पाहायला मिळतात. याचा परिणाम थेट तुमच्या घरातील बजेटवर पडताना पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदी एक महागाई थेट तुमच्या किचनच्या बटेवर परिणाम करताना दिसणार आहे. आता टोमॅटोच्या भावात वाढल्या आहेत. उष्णतेमुळे देशभरात टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत. उष्णतेच्या लाटा आणि उशिरा आलेल्या मान्सूनमुळे अनेक राज्यांमध्ये टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांचा समावेश आहे, जी टोमॅटोच्या बहुतांश पुरवठ्याचे स्रोत आहेत.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या राज्यांमधून ताज्या टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्यामुळे ऑगस्टपर्यंत टोमॅटोच्या किमती वाढलेल्या राहू शकतात. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, बाजारात टोमॅटोच्या किमती गेल्या महिन्याच्या तुलनेत 16 टक्क्यांनी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाढत्या टोमॅटोच्या किमतींचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांच्या घरगुती बजेटवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मे महिन्यात टोमॅटोचा महागाई दर 48.43% होता, ज्यामुळे अन्नधान्य महागाई 4.78% पर्यंत पोहोचली. क्रिसीलच्या अहवालानुसार, मे महिन्यात घरगुती जेवणाच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण टोमॅटो होते. या काळात, टोमॅटोचा सरासरी किरकोळ भाव मागील वर्षाच्या तुलनेत 57 टक्क्यांनी वाढून 36 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाला. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादनात अंदाजे 3-4 टक्क्यांची घट झाली, ज्यामुळे बाजारातील पुरवठा कमी झाला.
क्रिसिलच्या अहवालात असेही म्हटले आहे की, उत्तर भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये उन्हाळी पेरणी कमी झाल्यामुळे आणि खराब हवामानामुळे जून ते ऑगस्ट या काळात टोमॅटोचे भाव जास्त राहू शकतात. अहवालात असेही म्हटले आहे की, येत्या काही महिन्यांत भाजीपाल्याच्या किमतींवर दबाव राहू शकतो. कृषी मंत्रालयाने 2025-26 मध्ये टोमॅटोचे उत्पादन 21.46 दशलक्ष टन होण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 4.29% जास्त आहे. असे असूनही, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की टोमॅटोचे पीक हवामानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी लागवड होत असल्यामुळे, एक किंवा दोन प्रमुख उत्पादक राज्यांमधील खराब हवामान किंवा कमी उत्पादनाचा पुरवठ्यावर त्वरित परिणाम होतो. जून-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरसारख्या कमी उत्पादन असलेल्या महिन्यांमध्ये भावात होणाऱ्या तीव्र वाढीच्या स्वरूपात हे विशेषतः दिसून येते.
व्यापाऱ्यांवर परिणाम
वाढत्या टोमॅटोच्या किमतींचा परिणाम केवळ सर्वसामान्यांवरच नाही, तर निर्यात व्यापाऱ्यांवरही झाला आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे, परदेशी खरेदीदार आता स्वस्त टोमॅटोसाठी इतर देशांकडे वळू शकतात. दरम्यान, भारतातील शेतकऱ्यांसमोर देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याचे आव्हान उभे आहे.
हॉटेलवर परिणाम
वाढलेल्या टोमॅटोचा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावरही जाणवत आहे. अनेक घरांनी आणि हॉटेल्सनी त्यांच्या स्वयंपाकात टोमॅटोचा वापर कमी केला आहे. सांबार, रसम आणि इतर ग्रेव्हीच्या पदार्थांसारख्या टोमॅटो लागणाऱ्या पदार्थांच्या वाढलेल्या किमती पाहता, हॉटेल्सदेखील त्यांच्या किमती वाढवण्याचा विचार करू शकतात.