Shraddha Kapoors Eetha Cinema Mangala Bansode: लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित ‘ईठा’ (Eetha) या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रचंड चर्चेत आला आहे. या टीझरमधून तमाशा सम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांची जीवनगाथा दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं या सिनेमात जीव ओतून काम केलं असून, तिचा अभिनय आणि अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून चित्रपटाच्या शीर्षकावरून प्रचंड वाद होताना दिसत आहे. या सिनेमाचा शीर्षक ‘विठाबाई’, ‘विठा’ न ठेवता ‘ईठा’ असं का ठेवण्यात आलं? हा प्रश्न उपस्थित करुन वाद होताना दिसत आहे.
‘ईठा’ या नावावरुन विठाबाई नारायणगावकर यांचे कुटुंब देखील नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनी देखील या सिनेमाच्या नावाचा विरोध केला असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात विठाबाई नारायणगावकर यांची मुलगी मंगला बनसोडे – करवडीकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मुलाखतीत सिनेमाच्या शीर्षाकावरुन कोणताही आक्षेप नसल्याचं सांगितलं.
‘या सिनेमाचे शीर्षक योग्य आहे’, सिनेमाच्या शीर्षकावरुन मंगला बनसोडे नेमकं काय म्हणाल्या? (Mangala Bansode on Eetha Film Title)
काही दिवसांपासून ‘ईठा’ या सिनेमाचे शीर्षक चर्चेचा विषय ठरत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, विठाबाईंच्या कुटुंबातील सदस्य मोहित नारायणगावकर यांनी या सिनेमाच्या शीर्षकाचा विरोध केला होता. त्यांनी सिनेमाच्या शीर्षकात विठाबाई यांचं संपूर्ण नाव घेण्याची मागणी केली होती. यात राजकीय पक्षानेही आक्षेप घेतला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सर्व प्रकरणात विठाबाई यांच्या ज्येष्ठ कन्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अन् तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘आम्हाला ‘ईठा’ या चित्रपटाच्या शीर्षकावरुन कोणताही आक्षेप नाही. मी मोहितसोबत बोलले आहे. तसेच त्याला यावर कोणतेही विधान न करण्याची विनंती केली आहे’.
‘या सिनेमाचे शीर्षक योग्य आहे. कारण त्या काळी गावातील लोक माझ्या आईला ‘ईठा’ या नावाने हाक मारत होते’, अशी माहिती मंगला बनसोडे यांनी दिली. त्यांनी याबद्दल लक्ष्मण उतेकर यांनाही सांगितलं असल्याची माहिती मंगला बनसोडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली. ‘सात वर्षांची असल्यापासून मी रंगमंचावर सादरीकरण करत आहे. मी लहानपणीपासून माझ्या आईला या नावाने हाक मारताना ऐकलं आहे’, असं मंगला बनसोडे म्हणाल्या. ‘मला आनंद आहे की, माझ्या आईच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा येतोय. या सिनेमातून माझ्या आईचं कलेप्रति असलेलं योगदान लोकांना कळेल’, असंही मंगला बनसोडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या: