Health: पूर्वी मूळव्याध (पाइल्स) ही समस्या मुख्यतः वयस्कर लोकांमध्ये दिसून येत होती. मात्र आता ही समस्या मोठ्या प्रमाणात नोकरदार आणि काम करणाऱ्या तरुणांमध्येही आढळत आहे. आजकाल अनेक लोक तासन्तास कार्यालयात बसून काम करत असल्यामुळे डॉक्टरांना नोकरदारांमध्ये मूळव्याधीच्या (पाइल्स) रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. बैठी जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कमी पाणी पिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे ही समस्या वाढत आहे. अपोलो स्पेक्ट्रा पुणे येथील जनरल सर्जन डॉ. किरण कुमार जाधव यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे…
कर्मचाऱ्यांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढताना दिसतंय…
डॉ. किरण कुमार जाधव म्हणाले, दीर्घकाळ बसून काम करणे, पुरेशी हालचाल न करणे, अयोग्य आहार घेणे तसेच गुदद्वाराजवळ होणारी खाज, जळजळ, अस्वस्थता किंवा शौचाच्या वेळी रक्त येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत काही सोपे बदल करून आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही समस्या टाळता येऊ शकते. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशा कार्यालयीन वेळेत सतत बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
30 ते 45 वयोगटातील नोकरदारांना त्रास…
डॉ. जाधव म्हणाले, “अनेक कर्मचारी दररोज आठ ते दहा तास किंवा त्याहून अधिक वेळ खुर्चीवर बसून काम करतात. जास्त वेळ बसून राहिल्यामुळे गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि त्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. कमी पाणी पिणे, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा अभाव, बद्धकोष्ठता आणि व्यायाम न करणे यामुळे हा धोका आणखी वाढतो. काम करणाऱ्या लोकांमध्ये मूळव्याधीच्या रुग्णांची संख्या जवळपास ६० टक्क्यांनी वाढली आहे. दर महिन्याला 30 ते 45 वयोगटातील 10 पैकी सुमारे 6 कार्यालयीन कर्मचारी गुदद्वाराजवळ अस्वस्थता, खाज, वेदना, शौचाच्या वेळी रक्त येणे, सूज येणे किंवा शौच पूर्ण न झाल्यासारखे वाटणे अशा तक्रारी घेऊन येतात. योग्य वेळी उपचार न घेतल्यास सतत वेदना होणे, वारंवार रक्तस्त्राव होणे, शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणे आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.”
मूळव्याध टाळता येऊ शकते?
डॉ. जाधव पुढे म्हणाले, “जीवनशैलीत काही साधे बदल करून मूळव्याध टाळता येऊ शकते. फळे, भाज्या, सॅलड आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा. जंक फूड, जास्त तिखट पदार्थ आणि डबाबंद अन्न टाळावे. दिवसभर पुरेसे पाणी पिल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि शौचाच्या वेळी जास्त ताण द्यावा लागत नाही. प्रत्येक तासाला थोडे चालणे, दीर्घकाळ बसून न राहणे, नियमित व्यायाम करणे आणि शौचाची इच्छा झाल्यावर ती दाबून न ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजाराची तीव्रता समजू शकते आणि पुढील गुंतागुंत टाळता येते. आजकाल कमी वेदनादायक आणि आधुनिक उपचार उपलब्ध असून त्यातून रुग्ण लवकर बरे होऊ शकतात.”
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report