मुंबई : इतिहासामध्ये अनेक गद्दार झाले, त्यांना काही भूमिका होती का? एकंदरीत गद्दारांना कोणतीही भूमिका नसते आणि ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार आहेत, अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जर कुणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातून एकनाथ शिंदे यांचा वापर केला जातोय असा दावाही संजय राऊत यांनी केला.
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. गोकुळ गिते यांना भाजपने ताकद पुरवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही मतदान केलं, असं राऊत म्हणाले.
Sanjay Raut On Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांवर जहरी टीका
यावेळी ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंची साथ देणाऱ्या ओमराजे निंबाळकरांवर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गद्दारांना भूमिका असते का? ठाकरेंना सोडून गेलेले सगळे हे नामचिन गद्दार आहेत. शिंदें गटामध्ये गेल्यानंतर ओम निंबाळकरांच्या वडिलांचा आत्मा त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न. आता ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्याच गटामध्ये आहेत. आता तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील हा निव्वळ स्वार्थीपणा आहे.
ओमराजे निंबाळकरांच्या वतीने कुणी पैसे घेतले, पहिला 15 कोटींचा अॅडव्हान्स कुठे आणि कसा घेतला गेला याची सगळी माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचली आहे, असंही संजय राऊत म्हणाले. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राला तोडण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut On Nashik Vidhan Parishad Result : भाजपने शिंदेंचा उमेदवार पाडला
नाशिक विधान परिषदेमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गिते यांनी शिंदेंच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. असं असलं तरी महायुतीच्या मतदारांनी त्यांना मतदान कसं काय केलं? या सगळ्या मतदारांना ठाण्यात ठेवण्यात आलं होतं, तरीही त्यांनी विरोधात मतदान केलं. याचा अर्थ भाजपच्या सगळ्या मतदारांनी गोकुळ गिते यांना मतदान केलं.”
गोकुळ गिते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितलं. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना मदत केली, त्याचा गोकुळ गितेंना फायदा झाला, असं संजय राऊत यांनी सांगितलं. शिंदेंचा एक उमेदवार भाजपने पाडला. याला उद्गेक म्हणून शकता. यामध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. धमक्या देऊनही मतदारांनी शिंदेंच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं, असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut On Eknath Shinde : फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी शिंदेंचा वापर
संजय राऊत म्हणाले की, “भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जो काही वाद सुरू आहे, त्याची ही सुरुवात आहे. ज्या पद्धतीने दिल्लीतून शिंदेंना बळ दिलं जातंय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, याची कल्पना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे.देवेंद्र फडणवीस यांची ताकद कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर केला जात आहे. आमची शिवसेना कमजोर केली जाते ते महाराष्ट्राची ताकद कमी करण्यासाठी आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी.”
आम्ही कुणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच नाही. कारण इथे भूत की राक्षस असं आहे. पण अमित शाहांनी निर्माण केलेला एकनाथ शिंदेंसारखा सैतान असेल, जो देवेंद्र फडणवीसांच्याही मानगुटीवर बसत असेल तर आम्ही त्याबाबत योग्य ती भूमिका घेऊ, असं संजय राऊत म्हणाले.
ही बातमी वाचा:
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?